मुंबई महानगरपालिका (File Photo)
मुंबई

BMC Election 2026 : 60 ते 80 जागांवर ठाकरेंचा बसू शकेल फटका

युती टाकणार सावध पावले; आज मुख्यमंत्री फडणवीस-एकनाथ शिंदे घेणार निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः मृणालिनी नानिवडेकर

ठाकरे बंधूंच्या पक्षमिलनामुळे मुंबईतील 60 ते 80 जागांवर महायुतीचे उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता आहे. तो टाळण्यासाठी कोणी कोणी कुठे लढायचे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. रविवारी 28 डिसेंबर रोजी रात्री या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. मराठी कार्डला रोखण्यासाठी ‌‘जिंकण्याची शक्यता‌’ या एकमेव निकषावर जोर देऊ, असे ठरले आहे. या सूत्रामुळे मुंबईतील महायुतीचे वाटप अडले आहे.

20 ते 30 जागांवर दावे-प्रतिदावे आहेत. आज ता. 28 रोजी अंतिम चर्चेला प्रारंभ होईल. आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी भाजप लढणार असलेल्या 128,तर शिवसेनेच्या 79 जागा सध्या ठरल्या आहेत, असे माध्यमांना सांगितले. या जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरित जागांवरील स्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नेत्यांदरम्यान चर्चा सुरू राहील, असेही ते म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीच्या वर्चस्व असलेल्या 60 ते 80 जागांवर परिणाम होऊ शकतो, असा प्रारंभिक अंदाज आहे. या जागा कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ नये त्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेना शिंदे गट हा काही जागांबद्दल अत्यंत आग्रही असला तरी त्या निवडून येऊ शकत नाहीत, असा भारतीय जनता पक्षाचा अंदाज आहे. या संदर्भातील सर्व आकडेवारी दोन्ही पक्षांनी एकमेकांना सादर केली आहे.

या तिढ्यातून कसा मार्ग निघेल हे आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील, असे स्पष्ट करण्यात आले. युतीत जागा लढणार आहोत, कोणी किती जागा लढायच्या हे ठरवले जाईल, त्यात कोणताही वाद नाही, असे दोन्ही गटांकडून स्पष्ट केले गेले.शिवसेना शिंदे गटातर्फे या चर्चेत सहभागी होणाऱ्या राहुल शेवाळे यांनी जागा कोणी लढवायच्या हा प्रश्न लवकरच सुटेल, असे आज स्पष्ट केले.

ठाकरेंकडेही चर्चा सुरू!

दरम्यान ठाकरे बंधूंमधील जागा वाटपाची चर्चाही अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडुप मतदारसंघांमध्ये नेमके कोणी कुठे लढायचे याबद्दल अद्याप चर्चा सुरू आहे. आज जागांचे प्रस्ताव घेऊन मनसेचे नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. जिंकू त्या जागा लढू, असे सूत्र सध्यातरी स्वीकारले गेले आहे. आम्हाला युतीचा फारसा अनुभव नसल्यामुळे जागावाटपाला काहीसा वेळ लागेल, मात्र सर्व व्यवस्थित होईल, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथील जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली असून महायुती आणि ठाकरे बंधू या दोघांनाही पुढचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. 28 तारखेच्या रात्री या संदर्भातील चित्र दोन्ही बाजूंनी स्पष्ट होईल.चर्चा करताना विरोधकांना ती जागा जिंकता येऊ नये याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ठाण्यात शिवसेना 85 जागा लढेल. कल्याण-डोंबिवलीत युतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.

उरलेले स्थानही जाऊ नये म्हणून पवारांनी घेतला निर्णय

अजितदादा पवार यांच्या समवेत जाण्याचा निर्णय पुण्यात घेतल्यास उरलेले सहानुभूतीदारही नाराज होतील हे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र येण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे समजते. प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये,अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद हा लक्षणीय होता. तो लक्षात घेता जे काय सहानुभूतीदार उरले आहेत, त्यांनीही मतदान करताना तोंड फिरवू नये यासाठी आपण दादाबरोबर जाणे योग्य नाही या निष्कर्षावर शरद पवार गट आला आणि त्यामुळे दोन पवार पुण्यात एकत्र आले नाहीत, असे एका ज्येष्ठ नेत्याने पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT