Mumbai pod taxi project pudhari photo
मुंबई

Mumbai pod taxi project : बीकेसीची वाहतूककोंडी २०३१ पर्यंत साेडवणार पॉड टॅक्सी

तीन टप्प्यांत महत्त्वाची २२ ठिकाणे जोडणार; पहिल्या टप्प्याचे काम यावर्षीच्या डिसेंबरपासून

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नमिता धुरी

वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) येथून दूरवरच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सध्या भुयारी मेट्रोचा आणि भविष्यात मेट्रो २ ब मार्गिकेचा पर्याय उपलब्ध होणार असला तरी बीकेसीतील अंतर्गत प्रवासात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. २०३१ पर्यंत मात्र हा प्रवास वेगवान होणार असून २२ ठिकाणे पॉड टॅक्सीने जोडली जाणार आहेत.

पॉड टॅक्सी प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वांद्रे पूर्व आणि कुर्ला या दोन्ही रेल्वे स्थानकांपासून काही अंतरापर्यंत पॉड टॅक्सी सुरू केली जाणार आहे. एकूण ८.८५ किमीपैकी ३.३६ किमी प्रकल्प पहिल्या टप्प्यात आहे.

वांद्रे पूर्व ते उत्पादन शुल्क विभाग आणि कुर्ला ते बीडीबी गेट ११ या मार्गांवरील वाहतूक डिसेंबर २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. दुसर्‍या टप्प्याचे काम २०२८ मध्ये सुरू केले जाईल. २०३१ पर्यंत उर्वरित सर्व ठिकाणे जोडली जातील. यात सेबी, एनएसई, नाबार्ड, एमसीए, इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.

बीकेसीतील अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. साई ग्रीन मोबिलिटी लिमिटेड या कंपनीकडे या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले असून हीच कंपनी प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी आणि संचालन करेल.

या प्रकल्पातून एमएमआरडीएला दरवर्षी १ कोटी रुपये मिळणार आहेत. एवढेच नाही तर या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातील २१ टक्के हिस्सा एमएमआरडीएचा असेल.

स्थानके :

१. वांद्रे पूर्व, २. कलानगर जंक्शन, ३. एमएमआरडीए जुनी इमारत, ४. उत्पादन शुल्क विभाग, ५. एनएसई, ६. आयसीआयसीआय , ७. सेबी भवन, ८. नमन चेंबर, ९. रहेजा कॉर्पोरेशन, १०. गोदरेज, ११. बटरफ्लाय, १२. नाबार्ड, १३. बीडीबी गेट, ९ १४. बँक ऑफ बडोदा, १५. एमसीए, १६. बीडीबी गेट, ११ १७. जिओ वर्ल्ड सेंटर, १८. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, १९. यूएस दूतावास, २०. एमएमआरडीए पे ॲण्ड पार्क, २१. एलबीएस मार्ग, २२. कुर्ला

रेल्वे, मेट्रो स्थानकांना जोडणी

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक येथून पॉड टॅक्सीला सुरुवात होईल. कुर्ला रेल्वे स्थानक पॉड टॅक्सी स्थानकाशी जोडण्यासाठी १८८ मीटरचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभाग या स्थानकापासून जवळच मेट्रो २ ब आणि मेट्रो ३ यांची स्थानके आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT