मुंबई : बीकेसी येथे सुरू असलेल्या मेट्रो २ब मार्गिकेतील स्थानकाच्या बांधकामादरम्यान पूर्व निर्मित खांब (प्री-कास्ट बीम) उचलत असताना काही यांत्रिक बिघाडामुळे सुमारे ४०० टन वजनाची मोबाईल क्रेन एशियन हार्ट रुग्णालय जंक्शनजवळ कलंडल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३०च्या सुमारास घडली; मात्र खांब पूर्णपणे न कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.
दोन क्रेनच्या साहाय्याने प्रीकास्ट बीम (पूर्वनिर्मित काँक्रीट) मेट्रो स्थानकावर बसवण्याचे काम सुरू असताना, त्यापैकी एक क्रेन यांत्रिक बिघाडामुळे कलंडली. त्या प्रक्रियेदरम्यान बीम हा बसवण्याच्या स्थितीत असल्याने तोही एका बाजूला झुकला. कंत्राटदार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या मार्फत मेट्रो मार्गिकेच्या रात्रीच्या कामादरम्यान ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. हा अवजड बीम कोसळला असता तर मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्यांना गंभीर दुखापत होऊ शकली असती. यामुळे मेट्रो कामांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वीही अनेकदा मेट्रो मार्गिकांच्या बांधकामांमध्ये दुर्घटना घडल्या आहेत.
या घटनेनंतर कलंडलेली क्रेन तातडीने हटवून वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही कलंडलेली क्रेन सुरक्षितपणे हटवण्यासाठी ६०० टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात आला. घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आणि तपासणी करण्यात आली.