

मुंबई: मेट्रो 4 मार्गिकेचा काही भाग कोसळून मुलुंड येथे झालेल्या गंभीर अपघाताला रिलायन्स इन्फ्रा आणि अस्ताल्दी यांची भागीदारी कंपनी म्हणजेच आरएजेव्ही जबाबदार असल्याचा ठपका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
मुलुंड येथे मेट्रो 4 मार्गिकेचे बांधकाम सध्या सुरू असून 14 फेब्रुवारीला त्यातील काही भाग चालत्या रिक्षावर कोसळला होता. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) बसवराज भद्रगोंड यांनी नुकताच या घटनेचा अहवाल महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांना सादर केला.
यानुसार, कंत्राटदार, वेल्डर, पर्यवेक्षक, अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक यांना जबाबदार धरण्यात आले आहे. असुरक्षित कार्यपद्धतीचा अवलंब करणे आणि कामासाठी सोपे मार्ग वापरणे यांमुळे अपघात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुलाचा तयार भाग आवश्यक ठिकाणी लावताना त्याला धातूच्या सहाय्यकाने सुरक्षित करणे आवश्यक असते. हे सेगमेंट चिकट द्रवाने जोडल्यानंतरच धातूच्या सहाय्यकाचा आधार काढून घेता येतो. 6 बाय 4 फूट आकाराचा आणि 1.8 टन वजनाचा हा सेगमेंट 13 फेब्रुवारीला रात्री धातूच्या सहाय्यकाच्या आधारे लावला होता. तो चिकट द्रवाने न जोडताच त्याचा आधार काढून घेण्यात आला. परिणामी, गंभीर अपघात झाला. यासाठी आरएजेव्हीला जबाबदार धरण्यात आले आहे.
दंडात्मक कारवाई
14 फेब्रुवारी रोजी स्लॅब कोसळल्यानंतर लगेचच, एमएमआरडीएने या घटनेसाठी आरएजेव्हीला 5 कोटी रुपयांचा दंड आकारला, ज्यामध्ये त्यावेळी कंपनीचा कोणताही प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित नसल्याचाही समावेश होता. जनरल कन्सल्टंटला (डीबी, हिल इंटरनॅशनल आणि लुई बर्जर यांचा समूह) 1 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला, तर 18 फेब्रुवारी रोजी त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या.