Mumbai metro expansion | मेट्रोमय महामुंबई

Mumbai metro expansion |
Mumbai metro expansion | मेट्रोमय महामुंबई
Published on
Updated on

शशिकांत सावंत

महामुंबईत मेट्रोचे विस्तारणारे जाळे, नवी विमानतळे आणि नियोजित शहरे यामुळे दळणवळण व विकासाला नवी गती मिळत आहे. तिसरी व चौथी मुंबई साकारताना वाहतूक, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधींचा मार्ग मोकळा होत आहे.

मुंबई, ठाणे, पनवेल, बदलापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, अंबरनाथ, भिवंडी अशा महामुंबईमध्ये आता मेट्रोचे जाळे गतिमान होत आहे. 14 मेट्रोलाईनपैकी चार सुरू झाल्या आहेत. उर्वरित मार्गस्थ होत असल्याने महामुंबईतील तिसरी आणि चौथी मुंबई यांचे कार्यक्षेत्र मेट्रोने जोडले जाणार आहे. त्यामुळे गतिमान वाहतुकीचा मार्ग प्रवाशांना उपलब्ध होईल. वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महामुंबईत मेट्रोच्या 1 ते 14 लाईन सुरू करण्याचा निर्णय झाला. यातील पहिल्या 1 ते 3 लाईन आणि आता नववी लाईन सुरू झाली आहे. मुंबई-ठाणे जोडणारी मेट्रो 4 लवकरच सुरू होण्याच्या टप्प्यावर आहे. या सर्व मेट्रोंच्या विस्तारात शहरांतील वाहतूक कोंडी सोडविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महामुंबईमध्ये एकूण मुंबईसह सात महापालिका येतात. याच क्षेत्रात मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मेट्रो 14 मुंबई ते बदलापूर अशा थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून बहुचर्चित कांजूर मार्ग बदलापूर मेट्रो प्रकल्पासाठी नव्या सल्लागार तज्ज्ञ समितीची नेमणूक केली जाणार आहे. ही महामुंबई परिसरातील सर्वाधिक लांबीची मेट्रो ठरणार आहे. मेट्रो 4 वडाळा ते कासारवडवली देखील लवकरच सुरू होईल. बदलापूरहून मुंबईत जाणार्‍या प्रवाशांसाठी मेट्रो लाईन 14 कार्यान्वित होणार आहे. याशिवाय महामुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदराला जोडून होत असलेला सी फेस एअरपोर्ट असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणार आहेत.

महामुंबई ही प्रामुख्याने ठाणे, पालघर आणि रायगड या कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये विस्तारत आहे. त्यामुळे कोकणातील प्रमुख जिल्ह्यांच्या मुख्यालयांना शहरीकरणाचे स्वरूप आले आहे. खरे तर, तिसरी मुंबई म्हणजेच नैना प्रकल्प. हा भाग नियोजनबद्ध रस्ते विकासाने आणि औद्योगिकीकरणाने विकसित होणारा प्रदेश आहे. येथे महापेपासून पाताळगंगापर्यंत मोठ्या एमआयडीसी आहेत. या औद्योगिक पट्ट्याला जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

पालघर जिल्ह्यात साकारत असलेल्या चौथ्या मुंबईच्या विकासासाठी रस्त्यांसोबतच मेट्रो लाईनचाही समावेश केला आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई नावाचे नवे शहर उभारण्याची कार्यवाही सुरू झाली. हे शहर अटल सेतूने जोडले गेले आहे. याच सेतूचा विस्तार आता अलिबागपर्यंत होणार आहे. तिसरी मुंबईत पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये 12 हजार कोटी रुपये खर्च करून रस्ते केले जात आहेत. नैना क्षेत्रातील रस्त्यांचे जाळे उभारणीसाठी सर्व अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून विकास करणार आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढवण, डहाणू आणि वसई-विरार पट्ट्यात प्रस्तावित चौथी मुंबई हा एक महाकाय नियोजित नागरी प्रकल्प आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूनंतर (तिसरी मुंबई) हा प्रकल्प 512 चौरस कि.मी. क्षेत्रावर विकसित केला जाईल. यात जागतिक दर्जाचे बंदर, ग्रीनफिल्ड विमानतळ, बुलेट ट्रेन स्टेशन आणि औद्योगिक पट्ट्यांचा समावेश आहे. केंद्र शासनाने यासाठी निधी दिला आहे. हा प्रकल्प लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित केला जात असून मुंबई कोस्टल रोडला या बंदराशी जोडले जाईल. तसेच, बुलेट ट्रेनचे स्टेशन आणि मेट्रो प्रकल्प येथे असतील. मुंबई महानगर प्रदेशचा विस्तार करत 33.88 चौरस कि.मी.वरून 512 चौरस कि.मी.पर्यंत हे क्षेत्र वाढवून गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जातील. या भागात 10 लाख परवडणारी घरे आणि 30 लाख झोपडपट्टीधारकांसाठी पुनर्विकास योजनांचा आराखडाही विकसित होणार आहे. वाढवण बंदरामुळे ही चौथी मुंबई कोकण आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठी भूमिका बजावेल. एकंदरीत महामुंबईमुळे जलद वाहतुकीबरोबर नव्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news