मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सायकल मार्गिका हटवण्यात आली असून यामुळे येथील रस्ते आता प्रशस्त झाले आहेत. वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
सायकल मार्गिका काढल्याने दोन पदरी रस्ते आता तीन पदरी झाले आहेत. रस्त्यांच्या रूंदीत 50 टक्के वाढ झाली आहे. परिणामी, गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी काही प्रमाणात कमी झाला आहे. सिग्नल किंवा अरुंद जागांवर प्रतीक्षा वेळ 10 मिनिटांवरून 7 मिनिटांपर्यंत येणार आहे.
सध्या बीकेसीत दररोज सुमारे 2 लाख कर्मचारी आणि 4 लाखांहून अधिक अभ्यागत येतात आणि गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी ही येथील एक गंभीर समस्या आहे. शीव उड्डाणपूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वळवण्यात आली आहेत. बीकेसी मार्ग हा प्रामुख्याने लहान वाहनांसाठी अनुकूल आहे. मात्र सध्या ट्रक तसेच अवजड वाहने व मालवाहतूक वाहनांचा प्रवास या मार्गावरून होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सायकल मार्गिका काढून टाकण्यात आली आहे.
कार्बन उत्सर्जन कमी
एक पेट्रोल कार दर किमीला सुमारे 170 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते. सरासरी 40 कमी प्रतितास वेगाने 2.3 किमीचा प्रवास करताना कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन 30 टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित असून ते प्रतिवाहन 1 हजार 133 ग्रॅमवरून 793 ग्रॅम इतके होईल.