

रायगड ः शेतातील कापलेले आणि मळणी केलेले भात (तांदूळ) मुख्य रस्त्या पर्यंत आणण्याकरिता आवश्यक पोहोच अर्थात पाणंद रस्ता अलिबागच्या खारेपाटातील शेतकऱ्यांनी मागणी करुनही गेल्या पाच वर्षांपासून झाला नसल्याने सद्यस्थितीत शेतातील कापून मळणी केलेले भात गोणींमध्ये भरुन, खाडीतून छोट्या होडीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यापर्यत आणावे लागत आहे.
या दरम्यान छोटी होडी खाडीमध्ये उलटून भाताच्या गोणी खाडीच्या खाऱ्या पाण्यात बुडून नुकसान होण्याचे प्रसंग देखील येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहेत. या गंभीर परिस्थितीची रायगड जिल्हा प्रशासनाने दखल घेवून आम्हाला तातडीने पाणंद रस्ता करुन द्यावी अशी मागणी शहापूर मधील शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्तीदल शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली आहे.
अलिबाग तालुक्याच्या खारेपाटातील शहापूर गावांमधील सर्व्हे क्र. 279 ते 335 पर्यंतचा पाणंद रस्त्याचे अंदाजपत्रक बनवण्याकरिता संबंधीत यंत्रणेला निर्देश देण्याबाबत श्रमिक मुक्ती दल शेतकऱी संघटनेने 7 सप्टेंबर 2022 रोजी रायगड जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन दिले होत. परंतू त्यावर आजतागायत कार्यवाही झाली नसल्याचे संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदकुमार पाटील यांनी सांगीतले.
तालुक्यातील 62 जिताडा मत्स्य तलाव व तेथे कृषी पर्यटन अशी संकल्पना राबवण्यासाठी रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचेकडे 19 मार्च 2020 रोजी प्रस्ताव सादर केला होता. पैकी काही तलावांना त्यांनी भेटी देखील दिल्या होत्या. या सर्व तलावाना जोडण्यासाठी व पर्यटन वाढण्यासाठी पाणंद रस्ते मागणी केली होती. ती पूर्णत्वास जाण्यासाठी 4 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. पाणंद रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी आपली ना हरकत अलिबाग तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात 14 ऑगस्ट 2020 रोजी दिलेली आहे.
या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्कायासाठी शेतकर्ऱ्यांनी तत्कालीन तहसिलदार मीनल दळवी यांच्या बरोबर 30 नोहेंबर2021 रोजी बैठक देखील झाली होती. परंतु या पाणंद रस्त्याचे अंदाजपत्रक कोणी बनवायचे यावर कोणीच सहमती दर्शवली नाही.त्यामुळे पाणंद रस्ता गेली पाच वर्षे होऊ शकला नाही. या पाणंद रस्त्याचे अंदाजपत्रक बनवणे, त्यास प्रशासकीय व तात्रिक मान्यता देणे, कार्यारंभ आदेश देणारी यंत्रणा अद्याप निश्चित झालेली नाही ती निश्चिती करून हा पाणंद रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा या करिता शेतकरी आता पून्हा रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे नंदकुमार पाटील यांनी सांगीतले.
रस्त्याअभावी अडचण
शेतांना पोहोच रस्ता म्हणजेच पाणंद रस्त्याने मुख्य रस्त्याला जोडून शेती माल लवकरात लवकर बाजारपेठेत पोहोचून शेतकऱ्यांना आर्थिकवृद्धी साध्य करुन देण्याकरिता राज्य शासनाने पाणंद रस्त्याची विशेष योजना गेल्या दहा वर्षापूर्वी अमलात आणली. अलिकडेच या पाणंद रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करुन तो अधिकृत पाणंद रस्ता म्हणून घोषीत करण्याचे धोरणही शासनाने जाहिर केले. त्याच बरोबर जे शेतकरी पाणंद रस्त्याची मागणी तहसिलदारांकडे करतील त्यांना पाणंद रस्ता मंजूर करुन तो बांधण्याकरिता लागणारे साहित्य देखील शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र अलिबाग तालुक्यांत गेल्या पाच वर्षांपासून हा रस्ता प्रलंबीत आहे.