

ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रडारवर पुन्हा एकदा ॲप-आधारित रॅपीडो बाईक आली असून जर संबंधित कंपनीने ई बाईकचा वापर न केल्यास थेट मालकांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. यापूर्वीही मंत्री सरनाईक यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या रॅपिडो कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. प्रादेशिक परिवहन विभागाला खिशात ठेवून या कंपन्या गृहीत धरणार असतील तर, मंत्री म्हणून या गोष्टी अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो आणि उबर यासारख्या ॲप-आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे निर्देश यापूर्वीही दिले होते. या कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करत प्रवाशांची सुरक्षा धोक्यात घालत असल्याने त्यांनी हे आदेश दिले होते. परंतु काही दिवसांनी या कंपनीला पुन्हा सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र अजूनही या कंपन्यांच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करत ई बाईकचा वापर न करता इतर बाईकचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी मात्र कडक भूमिका घेतली आहे.
तीन दिवसांपासून सर्व आरटीओला सूचना देण्यात आल्या असून यासंदर्भात सक्त ताकीद देखील देण्यात आली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. रॅपिडोला ई बाईक वापरण्याचीच परवानगी दिली आहे. मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात ई बाईक सोडून इतर बाईकचा वापर करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
जे लोकं नियमांचे पालन करणार नाहीत, त्या बाईकवाल्यांवर गुन्हे दाखल न करता थेट मालकांवरच गुन्हे दाखल करा, असे आदेश सर्वच आरटीओला दिले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांवर गुन्हे दाखल करा, मग 150 गुन्हे दखल झाले तरी चालतील, मात्र आरटीओला खिशात घेऊन जाणार असेल, तर प्रताप सरनाईक हे सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचे उद्घाटन
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांचा शुभारंभ मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये तरण तलाव, उद्याने, समाज मंदिरे अशा कामांचा समावेश असून काही कामे तर काही प्रमाणात अर्धवट असताना देखील याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
भिवंडीमुळे घोडबंदरमध्ये वाहतूक कोंडी
भिवंडीचे रस्ते बंद असल्याने घोडबंदरमध्ये वाहतूक कोंडी होत असून ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. 18 लाख लोकसंख्या 16 लाख वाहने, एक फ्लॅट असेल तर किती गाड्या घ्याव्यात हा देखील प्रश्न आहे. शेवटी तो नागरिकांचा अधिकार आहे. मेट्रोचे काम झाले तर वाहतूक कोंडी होईल. तसेच सेवा रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे, गायमुख घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर देखील मार्ग काढण्याचा प्रयन्त करत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
घोडबंदरला सेवा रस्ता कधी नव्हताच
घोडबंदर महामार्गावरील सेवा रस्त्यांचा समावेश हायवेमध्ये करण्याला नागरिकांनी मोठा विरोध दर्शवला होता. महामार्गाला सेवा रस्त्यांची आवश्यकता असताना अशाप्रकारे सेवा रस्त्यांचा समावेश हायवेमध्ये करणे धोक्याचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र घोडबंदरला सेवा रस्ते कधीच नव्हते, असा युक्तिवाद मंत्री सरनाईक यांनी केला आहे. हा पूर्वी 60 मीटरचा पूर्ण रस्ता होता, मात्र त्यावेळी एवढा मोठा रस्ता कशासाठी असा विचार पुढे आल्याने सेवा रस्ते निर्माण करण्यात आले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे यावरून कोणी राजकारण करू नये, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.