मुंबई : वरळी येथील सेंट रेजिस पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपने नियमबाह्य पद्धतीने कामगार नोंदणी केल्याच्या कारणावरुन भाजपचे पदाधिकारी, ठाकरे गटाचे कार्यकर्ते शुक्रवारी समोरासमोर आल्याने वाद उफाळला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीसांचा मोठा बंदोबस्त होता.
भारतीय कामगार सेना ही शिवसेना कामगारांची युनियन आहे. अनेक वर्षे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्या युनियन आहेत, असे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर सेंट रेजिस हॉटेलमधील कामगार स्वत:हून आमच्याकडे आले. त्यांना गेली 10 वर्षे येथे न्याय मिळत नाही, असे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये वाद झाला. वांद्रे येथे भाजपने आपला फलक व झेंडा लावला. मात्र शुक्रवारी वरळीत ठाकरेंच्या सेनेने विरोध केल्याने भाजपाने लावलेला फलक ठाकरेंच्या सेनेने फाडून टाकला. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. दरम्यान, भाजप- ठाकरे गटाचे पदाधिकारी समोरासमोर आल्याने एकच गोंधळ होऊन वाद निर्माण झाला.
राज्यात कायदा आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे मोडीत काढून नवीन धोरण आणण्याचे काम कामगारांच्या माध्यमातून करत आहेत. असे असताना काही लोकांना हाताशी धरून भाजपचे लोक शिरकाव करत आहेत. आमची जिथे संघटना आहे तिथे ते लोक घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.आ. सचिन अहिर, कामगार नेते