PM Modi Photo Controversy : पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढण्यास लावल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि भाजप आमनेसामने आले आहेत. या प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपने मनसेसह अमित ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.
नवनाथ बन यांनी 'एक्स'वर मालाड येथील मनसे कार्यालयाचा एक फोटो शेअर करत अमित ठाकरेंवर निशाणा साधला. "हा फोटो नीट बघा… महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नेमकं कोणतं स्थान दिलंय? इथं कुणासोबत तुम्ही तुलना करताय? जेन्युइनली तुमच्या नौटंकीचा पुन्हा पर्दाफाश झाला आहे!" अशा शब्दांत बन यांनी अमित ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्याराला भेट दिली होती. तेथे प्राचार्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशेजारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी?" असा सवाल उपस्थित करत अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तो फोटो काढण्यास सांगितला. या घटनेचा व्हिडिओ आणि वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.
या प्रकरणी प्राचार्यांच्या तक्रारीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र काशिराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमित ठाकरे यांनी पूर्वपरवानगी न घेता महाविद्यालयात प्रवेश केला, मेस व स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला आणि कार्यालयात घुसून मोदींचा फोटो काढण्यास भाग पाडले. विरोध केला असता उद्धट वागणूक देत घोषणाबाजी केली, तसेच आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाची धमकी दिली, असे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अमित ठाकरेंसह मनविसेच्या सुमारे २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.