Devendra Fadnvis Pudhari
मुंबई

BJP Shiv Sena Conflict: विधिमंडळातही भाजपाचा वरचष्मा; सेनेला शह, शिंदेंची हतबलता उघड

सातारा राड्यानंतर पोलिस निलंबनावर ब्रेक; सभागृहात शिवसेनेची आक्रमकता निष्फळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दिलीप सपाटे

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राड्याने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना सातारा जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणे विधानमंडळातही भाजपाने शिवसेनेला मात देत पोलिसांवरील निलंबनाची कारवाई रोखल्याची चर्चा आहे.

या प्रकरणानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिले होते. मात्र, या निर्देशांना विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी लागलीच स्थगिती दिली. त्यामुळे सभागृहातील आक्रमक भूमिकेनंतरही शिवसेनेच्या हाती तूर्त काहीही लागलेले नाही.

साताऱ्यातील राड्यावरून सोमवारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी आक्रमक रणनीती आखली. सभागृह सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ पक्षाची बैठक घेत सभागृहातील रणनीती ठरवण्यात आली. विधान परिषदेत शंभूराज देसाई यांनी त्यांना झालेली धक्काबुक्की आणि पोलिसांनी केलेली दडपशाही सभागृहात मांडली. त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ तुषार दोशी आणि अन्य दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. हा आदेश तत्काळ अमलात आणला जाईल,असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. पण काही वेळातच या आदेशाला खो बसला.

भाजपा नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी थेट कारवाईची घोषणा न करता

त्यावर चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय आणि नीलम गोऱ्हे यांचे निर्देश यापैकी कोणती कार्यवाही करायची याबाबत पेच होता. मात्र, विधान परिषद सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशांना स्थगिती दिल्याने तुषार दोशी आणि अन्य पोलिसांवरील कारवाई टळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंची नाराजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील राड्यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशींना फोन केले, पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची खंत बोलून दाखविली. दोशींनी फोन केल्यावर कोणत्याही सदस्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असे मला त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना फोन केला आणि साताऱ्यातील परिस्थिती सांगितली. मला जरा शंका आहे. शिवसेना-राष्ट्रवादीकडे बहुमत आहे. पण आमची मते कमी करण्यासाठी दोशी गडबड करीत असल्याचे दातेंना सांगितले.

त्यानंतर दातेंनी सातारच्या पोलीस अधीक्षकांना फोन केला. त्यानंतर मी स्वतः दोशी यांच्याकडे खात्री केली. त्यावेळी दोशी म्हणाले की, मला पोलीस महासंचालक दाते यांचा फोन आला होता, मी त्यांना कुणालाही मतदानापासून वंचित ठेवणार नसल्याचे सांगितले आहे. मी त्यांना तुमची लोकं गेटवर थांबली आहेत, त्यांना मतदान झाल्यानंतर कारवाई करण्याची सूचना तुम्ही द्या. पण मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आणि लोकशाहीचा खून आहे, अशी नाराजी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणात भाजपापुढे त्यांची झालेली हतबलताही समोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT