मुंबई : प्रकाश साबळे
भारतीय जनता पार्टीचा गड असलेल्या उत्तर मुंबई जिल्ह्यात 42 जागांपैकी भाजपाने 26 जागांवर विजय मिळवून भाजपाचा गड राखला. यात शिंदे गट 5, ठाकरे गट 4 आणि काँग्रेस पक्ष 5 जागेवर विजय मिळविला. उत्तर मुंबई जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ येतात.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघात वॉर्ड क्रमांक 12 च्या शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा गवस यांच्याविरोधात उबाठा पक्षाच्या सारिका झोरे यांनी 11232 मते घेऊन विजय मिळविला, तर वॉर्ड क्रमांक 25 च्या भाजपाच्या माजी नगरसेविका प्रीतम पंडागळे यांचा पराजय करून उबाठाचे धर्मेंद्र काळे यांनी 6459 मते घेऊन विजय खेचून आणला. या विधानसभेत भाजपाला दोन जागांवर यश मिळाले, तर शिंदे गटाला तीन जागा जिंकता आल्या.
तसेच कांदिवली पूर्व विधानसभेत आमदार अतुल भातखळकर सरस ठरले. त्यांनी 8 पैकी 6 जागांवर भाजपाला विजय मिळवून दिला, तर काँग्रेसच्या वॉर्ड क्रमांक 28 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अजंता यादव यांनी शिंदे गटाच्या वृषाली हुंडारे यांचा पराजय केला. तर उबाठानेसुध्दा वॉर्ड क्रमांक 29 मध्ये खाते उघडले.
आमदार अतुल भातखळकर यांचे निकटवर्तीय असलेले नितीन चौहान यांचा मागे टाकून उबाठाचे उमेदवार सचिन पाटील यांनी विजय मिळविला. यासह चारकोप विभानसभा मतदारसंघात भाजपाने मुसंडी मारली. या विधानसभेत 7 पैकी 6 जागांवर भाजपाने निर्विवाद विजय मिळविला, तर वॉर्ड क्रमांक 32 मध्ये उबाठा पक्षातील उमेदवार गीता भंडारी विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या मनाली भंडारी यांना पराभूत केले.
मालाड विधानसभेतही आमदार अस्लम शेख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. 7 जागांपैकी 4 जागांवर नगरसेवक निवडून आणले, तर 3 वॉर्डांत भाजपाला समाधान मानावे लागले. वॉर्ड क्रमांक 34 मध्ये आमदार अस्लम शेख यांचा मुलगा हैदरअली अस्लम शेख यांनी भाजपाचे जॉन डेनिस यांचा दारुण पराभव केला. तसेच वॉर्ड क्रमांक 33 मधील त्यांची बहीण कमरजहॉ सिद्दीकी यांनीसुध्दा भाजपाच्या उज्ज्वला वैती यांचा पराभव केला.
मागाठाणे
भाजपा - 02
शिंदे गट - 03
उबाठा - 02
दहिसर
भाजपा - 04
शिंदे गट - 02
उबाठा - 00
बोरिवली
भाजपा - 05
शिंदे गट - 00
उबाठा - 00
चारकोप
भाजपा - 06
शिंदे गट - 00
उबाठा - 01
मालाड
भाजपा - 03
काँग्रेस - 04
कांदिवली पूर्व
भाजपा - 06
शिंदे गट - 00
उबाठा - 01
काँग्रेस - 01