

मुंबई : मुंबईतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या प्रभाग 173 चा निकाल लागला आहे. याठिकाणी भाजपचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडलेल्या शिल्पा केळुसकरांनी विजय मिळवला आहे. केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा 1722 मतांनी पराभव केला आहे.परिणामी, शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील प्रभाग 173 ही जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. या ठिकाणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपच्या शिल्पा केळुसकरांनी त्यांना दिलेल्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि ती जोडून पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे आता त्यांचाच 1722 मतांनी विजय झाला आहे.
प्रचारादरम्यान शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केळुसकरांना ‘एबी फॉर्म चोर’ असे डिवचले होते. प्रभाग क्र. 173 मधून भाजपने केळुसकरांना एबी फॉर्म दिला होता. मात्र ही जागा शिंदे सेनेला गेल्याने सदर फॉर्म भाजपने परत मागून घेतला. मात्र केळुसकरांनी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून ती उमेदवारी अर्जासमवेत जोडली.
ही बाब लक्षात येताच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केळुसकरांचा अर्ज ग्राह्य धरू नये अशी विनंती केली. मात्र आयोगाने अर्ज ग्राह्य धरला.