Amit Satam Daughter: भाजप आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे. आपल्या १२ वर्षीय मुलीच्या कराटे क्षेत्रातील यशाचा अभिमान व्यक्त करतानाच त्यांनी कुटुंबाने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णयही जाहीर केला आहे.
साटम यांची मुलगी माहीका साटम हिने नुकताच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असून, तिला दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मात्र, कुटुंबाने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित साटम यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाचा आदर करत कुटुंबाने एकमताने निर्णय घेतला की, माहीका या स्पर्धेसाठी दक्षिण कोरियाला जाणार नाही.
साटम यांनी म्हटलं की, स्पर्धा पुन्हा येतील आणि भविष्यात माहीकाला अशा अनेक संधी मिळतील, याबाबत त्यांना विश्वास आहे. मात्र, ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनात ठेवून देशहितासाठी छोटासा वाटा उचलण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या निर्णयामध्ये मुलगी माहीकाने दाखवलेली समजूतदार भूमिका आणि देशाप्रतीची भावना पाहून अभिमान वाटत असल्याचंही अमित साटम यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यांनी पत्नी आणि मुलगी माहीका या दोघींचे विशेष आभार मानत, कुटुंबाने सकारात्मकतेने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं.
माहीका नुकतीच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट झाल्याने तिच्यासाठी ही स्पर्धा मोठी संधी मानली जात होती. मात्र, कुटुंबाने वैयक्तिक संधीपेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पोस्टच्या शेवटी अमित साटम यांनी “देशहित सर्वोपरि” असं म्हणत जय हिंद, जय महाराष्ट्र असा मेसेजही दिला आहे.