RCB Playoff Entry : ‘आरसीबी’चा धमाका! प्लेऑफमध्ये धडक मारणारा बनला पहिला संघ, ‘पंजाब किंग्स’चा सलग सहावा पराभव

Virat Kohli ने चालू हंगामात ५०० धावांचा टप्पा केला पार. तब्बल ९ हंगामात ५०० हून अधिक धावा करण्याचा ऐतिहासिक विक्रम नावावर.
RCB Playoff Entry : ‘आरसीबी’चा धमाका! प्लेऑफमध्ये धडक मारणारा बनला पहिला संघ, ‘पंजाब किंग्स’चा सलग सहावा पराभव
Published on
Updated on

धर्मशाळा : इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या ६१ व्या रोमांचक सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ होण्याचा बहुमान मिळवला आहे. धर्मशाळा येथील निसर्गरम्य स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने पंजाबला विजयासाठी २२३ धावांचे अवाढव्य आव्हान दिले होते. मात्र, पंजाबचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १९९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह आरसीबीने यंदाच्या हंगामातील आपला ९ वा विजय साजरा केला, तर दुसरीकडे पंजाब किंग्सला सलग सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. आरसीबीची सुरुवात खराब झाली असली तरी, स्टार फलंदाज विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची आक्रमक भागीदारी केली. पडिक्कलने ४५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर विराट कोहलीने ३७ चेंडूंत ५८ धावांची खेळी करत आयपीएल कारकिर्दीतील ६७ वे अर्धशतक झळकावले.

या खेळीदरम्यान कोहलीने चालू हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला असून, तब्बल ९ हंगामात ५०० हून अधिक धावा करण्याचा ऐतिहासिक विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. आरसीबीकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक नाबाद ७३ धावांची तुफानी खेळी केली, तर टिम डेविडने १२ चेंडूंत २८ धावा फटकावून संघाला ४ बाद २२२ या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

विजयाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अवघ्या १९ धावांवर त्यांनी आपले ३ महत्त्वाचे फलंदाज गमावले. त्यानंतर कूपर कोनोली आणि सूर्यांश शेडगे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अनुक्रमे ३७ आणि ३५ धावा करून बाद झाले. मधल्या फळीत मार्कस स्टॉइनिस आणि शशांक सिंह यांनी ६७ धावांची वेगवान भागीदारी करून पंजाबला सामन्यात परत आणले. शशांक सिंहने ५६ धावांची झुंजार खेळी केली, पण आरसीबीच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर पंजाबचा डाव १९९ धावांवर मर्यादित राहिला. आरसीबीकडून रसिक सलाम डारने ३ तर भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले.

या सामन्यादरम्यान पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून आपले १०० आयपीएल सामने पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. मात्र, या ऐतिहासिक सामन्यात पंजाबला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

सलग सहा पराभवांमुळे पंजाब किंग्सचा प्लेऑफचा मार्ग अत्यंत खडतर झाला असला, तरी त्यांचे आव्हान गणितीयदृष्ट्या अजून संपलेले नाही. पंजाबला आता २३ मे रोजी होणाऱ्या लखनऊविरुद्धच्या आपल्या अंतिम सामन्यात कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. याशिवाय, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आपल्या उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान एक सामना गमावणे आवश्यक आहे. तसेच राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनीही आपले आगामी सामने गमावावेत, अशी प्रार्थना पंजाबला करावी लागेल. हे सर्व समीकरणे जुळून आल्यास पंजाब किंग्स १५ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news