Colaba constituency politics
मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गटबाजी दिसून येत आहे. या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी आमदार राज पुरोहित हे दोन्ही गट छुप्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधात काम करताना दिसून येत आहेत.
कुलाबा विधानसभेमध्ये पूर्वी राज पुरोहित यांचे वर्चस्व होते. मात्र अंतर्गत वाद व वरिष्ठ नेत्यांशी मतभेद निर्माण झाल्यामुळे पुरोहित यांना विधानसभेची उमेदवारी नाकारत, मुख्य प्रवाहातून दूर करण्याचा प्रयत्न केला. तरीपण पुरोहित यांनी हार न मानता आपले काम सुरूच ठेवले. त्यामुळे मागील महापालिका निवडणुकीत राज पुरोहित यांनी शिफारस केलेल्या आकाश पुरोहित व रिटा मकवाना यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले माजी नगरसेवक जनक संघवी यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेत आकाश पुरोहित यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला.
काँग्रेसमध्ये गेलेले संघवी स्वगृही परतले. पण पुरोहित यांच्या बद्दल असलेला राग ते विसरू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी राहुल नार्वेकर गटासोबत आपली नाळ जोडली. नार्वेकर यांनी विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही संघवी यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे जनक संघवी नार्वेकरांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. स्वतःच्या प्रभागांमध्ये नार्वेकर यांचे कार्यालय सुरू करून, आजूबाजूचे दोन प्रभाग बांधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास संघवी यांना आहे.
कुलाबा विधानसभेतील 221 व 222 प्रभागामध्ये उमेदवारी मिळावी यासाठी संघवी यांनी नार्वेकरांमार्फत फिल्डिंग लावली आहे. या प्रभागात 2017 मध्ये राज पुरोहित यांचे चिरंजीव आकाश पुरोहित, तर कट्टर समर्थक रिटा मकवाना निवडून आले होते. त्यामुळे या दोघांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी राज पुरोहित वरिष्ठ पातळीवर प्रयत्नशील आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, विद्यमान माजी नगरसेवकांना डावलून अन्य कोणालाही उमेदवारी देऊ नये, अशी आग्रही भूमिका पुरोहित यांनी वरिष्ठांकडे मांडल्याचे बोलले जात आहे. तर जनक संघवी यांच्यासाठी स्वतः राहुल नार्वेकर प्रयत्नशील असून त्यांनी संघवी यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, असा ग्रीन सिग्नल दिला आहे. नेमका कोणाचा शब्द झेलावा, असा प्रश्न भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.
प्रभाग क्रमांक 226 मधून राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर व 227 प्रभागातून बंधू मकरंद नार्वेकर या दोघांना उमेदवारी मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे जनक संघवी यांच्यासाठी आग्रही असलेल्या नार्वेकरांचे म्हणणे भाजपा ऐकणार की, पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित व रिटा मकवाना यांना पुन्हा उमेदवारी देणार याकडे आता भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.