Ravindra Chavan Pudhari
मुंबई

BJP Election Review : रवींद्र चव्हाणांनी घेतली झाडाझडती

संबंधित जिल्हाध्यक्ष आणि निवडणूक प्रभारींकडून तातडीने अहवाल मागविला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात मजबूत पक्षसंघटना असूनही कमतरता राहिली. याची गंभीर दखल घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संबंधित जिल्हाध्यक्ष आणि निवडणूक प्रभारींकडून तातडीने अहवाल मागविला आहे.

पुणे आणि नागपूर मतदारसंघातील पराभव भाजप नेतृत्वाने गांभीर्याने घेतला आहे. जिल्हाध्यक्ष आणि निवडणूक प्रभारींकडून तातडीने अहवाल मागविण्यात आले आहेत. स्वतः रवींद्र चव्हाण हे २ नोव्हेंबरला दिल्लीला जात असून गृहमंत्री अमित शहा भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहेत.

पक्षाची मोठी यंत्रणा कामाला लागूनही पराभवाला सामोरे जावे लागले. दोन-तीन वर्षांपासून नोंदणीचे काम सुरू होते. जबाबदाऱ्या निश्चित होत्या. त्यामुळे कोणी काम केले नाही, कोणी विरोधकांना मदत होईल, अशी भूमिका घेतली त्याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. शिक्षक आणि पदवीधरांसारखा सुशिक्षित अभ्यासू मतदार असतानाही १७ हजार मते बाद झाली. याचा अर्थ निरोप नीट पोहोचले नाहीत.

हा केवळ निरोपाचा भाग होता की जाणीवपूर्वक काही गोष्टी घडविण्यात आल्या याची चाचपणी भाजप नेत्यांकडून सुरू आहे. त्यामुळेच तातडीने अहवाल मागविण्यात आले आहेत. या आधारे राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

पुणे आणि नागपूर पदवीधर तसेच पुणे शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांच्या जोरावरच भाजप उमेदवारांचा विजय निश्चित व्हायला हवा होता. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब अधोरेखितही केली होती. मात्र, विषय दुसऱ्या पसंतीच्या मतांपर्यंत पोहोचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT