

पुणे: बांधकाम अपूर्ण असतानाही ते पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करून भोगवटा प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 'माँटेरोझा' प्रकल्पाच्या बिल्डरसह आर्किटेक्ट आणि दोन अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
याप्रकरणी संबंधित बिल्डरची अन्य बांधकामे तातडीने थांबवण्यासह या प्रकल्पाच्या वास्तुविशारदाचा परवाना एक वर्षासाठी निलंबित करण्याचे आणि बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत.
हिंगणे खुर्द येथील सर्व्हे क्रमांक १९ वरील 'माँटेरोझा' या गृह प्रकल्पाचे काम अर्धवट असतानाही महापालिकेकडून सन २०२२ मध्ये बांधकाम पूर्ण झाल्याचे भोगवटा प्रमाणपत्राबाबत देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पातील अनेक कामे अद्याप अर्धवट असल्याचे समोर आले.
दै. 'पुढारी'ने हा प्रकार उजेडात आणला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण झाले का, मंजूर नकाशानुसार सर्व कामे झाली का आणि पर्यावरणविषयक आवश्यक मंजुरी प्राप्त झाली आहे का, याची खातरजमा न करता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे या प्रकरणातील चौकशीतून समोर आले.
त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकल्पाचे विकसक तुषार बिल्डर्स आणि बी.के. इन्फ्रा एलएलपी यांची शहरात सुरू असलेली सर्व बांधकामे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकल्पाचे वास्तुविशारद विलास जगन्नाथ येले यांची महापालिकेकडील नोंदणी परवाना किमान एक वर्षासाठी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन अभियंत्यांची विभागीय चौकशी
भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी बांधकामाची प्रत्यक्ष स्थिती तपासणे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. माँटेरोझा प्रकरणात या प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर व उप अभियंता राहुल तिखे यांच्यावर हलगर्जीप्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अभियंत्यांची भूमिका आणि प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.