Bhiwandi Mayor Election 2026 Pudhari
मुंबई

Bhiwandi Mayor Election 2026: काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचा महापौर

90 पैकी 48 मतांनी विजय; भाजपचे सहा नगरसेवक फुटले, महायुतीत दरी वाढल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : संजय भोईर

अनेक दिवस लांबलेल्या भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाचा नाट्यमय फैसला शुक्रवारी झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) आणि भाजप बंडखोरांच्या मदतीने भाजपचे बंडखोर नारायण चौधरी 90 पैकी 48 मते घेत महापौरपदी विजयी झाले, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारीक मोमीन विजयी झाले. काँग्रेसने भाजपला धक्का देत चंद्रपूरचा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भिवंडी महापालिका महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 20) दुपारी 12 ते 3 या वेळेत महापालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी भाजप, सेक्युलर फ्रंट आणि शिंदे सेना अशी भिवंडीच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

90 नगरसेवकांच्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे 30, भाजप 23, राष्ट्रवादी (श.प.) 12, शिवसेना 12, कोणार्क आघाडी 4, समाजवादी 6, भिवंडी विकास आघाडी 3 असे संख्याबळ होते. 3 उमेदवारांत मतविभागणी झाली. काँग्रेस-भाजप बंडखोर-राष्ट्रवादी (श.प.) चे उमेदवार नारायण चौधरी यांना 48 मते पडली. शिवसेनेचे उमेदवार विलास पाटील 25, भाजप अधिकृत उमेदवार स्नेहा मेहुल पाटील यांना 16 अशी मतविभागणी झाली. यात भाजपचाच

1 सदस्य अनुपस्थित राहिला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तारिक मोमीन 43 मतांनी विजयी झाले. शिवसेनेने समर्थन दिलेले भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी 25, भाजपाचे उमेदवार सुहास नकाते 21 अशी मते मिळाल्याने भाजपच्या अधिकृत महापौर पदाच्या उमेदवार स्नेहा पाटील यांच्या मतांपेक्षा नकाते यांना 5 मते अधिक पडली तरीही भाजपची 2 मते फुटली. दरम्यान, काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक आणि भाजपा चे बंडखोर नारायण चौधरी यांच्यासह त्यांचा 6 जणांचा बंडखोर गटही सेक्युलर फ्रंट सोबत व्होल्व्हो बसमध्ये फेटे बांधून शाही थाटात महापालिकेत दाखल झाले. त्यामुळे नारायण चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे नक्की झाले. भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर गैरहजर

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार नितेश एनकर गैरहजर राहिले.ऐनकर यांनी कोणार्क विकास आघाडी व शिंदे सेनेचे महापौर पदाचे उमेदवार विलास पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.त्यासंदर्भातील गट नोंदणी देखील कोकण आयुक्तांकडे करण्यात आली होती.मात्र ऐन निवडणुकीच्या दिवशी नितेश एनकर गैरहजर राहिल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

भाजपाच्या या 6 जणांनी केली बंडखोरी

नारायण चौधरी, नंदिनी गायकवाड, अश्विनी फुटाणकर, दीपा मढवी, सुहास नकाते, शेख अबूशाह लल्लन या 6 जणांनी बंडखोरी करीत सेक्युलर फ्रंटशी हात मिळवणी केली.

भिवंडी महापौर निवडणुकीच्या निमित्ताने महायुती दुभंगली

1) भिवंडी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणाऱ्या भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची युती निवडणूक निकालानंतर महापौर पदाच्या निवडणुकीनिमित्ताने दुभंगली असल्याचे चित्र समोर आले आहे. महापौर पदाच्या निवडीसाठी सर्वप्रथम भाजपाला संधी देण्यात आली. ज्यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेना 12 असे संख्याबळ असताना सुद्धा बहुमताची संख्या पूर्ण होत नव्हती.त्यानंतर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर होताच शिवसेनेने महापौर पदाच्या निवडणुकीत उडी घेतली.

2) शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांना सोबत घेऊन महापौर पदाच्या संख्याबळाचे गणित जुळवून आणण्यात शिवसेना यशस्वी होत असतानाच भाजपाने तिरकी चाल चालत भिवंडीतील सत्ता स्थापनेते गणित बिघडवून टाकले.ज्यांची संख्या जास्त त्यांची सत्ता या न्यायानुसार भाजपा पेक्षा शिवसेनेचे संख्याबळ अधिक झाल्यामुळे भिवंडीत शिवसेना कुठेतरी वरचढ होत होती. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भिवंडीत सेक्युलर फ्रंट सोबत सूत जुळवून घेत एक वेगळेच गणित समोर आणले.

3) भाजपाचे आमदार महेश चौगुले यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे भाजपाचे सहा नगरसेवक बंड पुकारून काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट सोबत गेले.त्या माध्यमातून भाजपाच्या फुटीर गटाने ही सत्ता हस्तगत केली आहे.परंतु या निमित्ताने भाजपा व शिवसेना यांच्यातील दरी वाढली आहे.

महापौर पदासाठी जनतेने भरपूर प्रेम दिले मी सर्वांचा आभारी आहे.भाजप पक्षश्रेष्ठीकडून कारवाईबाबत आता मिर्ची मसाला नको. विकासाला प्राधान्य दिले जाईल.‌
नारायण चौधरी, महापौर (भाजपा बंडखोर)
आमचे 30 नगरसेवक होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपच्या बंडखोरांनी आमच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केल्याने आम्ही एकत्र गणित जुळवलं. शेवटी जिता वही सिकंदर रहता है.
हर्षवर्धन सकपाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपला बंडखोरीचा फटका बसला. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवले. या निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महापौरपदाच्या उमेदवारीबाबत पक्षात चर्चा सुरू होती. स्नेहा पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बंडखोरी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला होता. त्यांनी बंडखोरी करणार नाही असे आश्वासन दिले होते; मात्र त्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT