Mumbai Mayor Politics Heats Up: बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर नसणार, ही बाब दुःखद असल्याचं सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसावा, यासाठी शिंदे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, पुढच्या काही दिवसांत या मुद्द्यावर नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, “हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं आहे. पण याच वर्षी मुंबईत शिवसेनेचा महापौर नसेल, यासारखं मोठं दुःख नाही.” बाळासाहेबांचे विचार पुढे नेतो, खरा वारसदार आहे, असे जे दावे केले जातात, त्यांची खरी परीक्षा हीच आहे, असं म्हणत जाधव यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं.
जाधव यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं की, शिंदे यांनी भाजपला सांगितलं पाहिजे की केंद्रात आणि राज्यात युतीसोबत राहू, पण मुंबईच्या महापौरपदावर शिवसेनेचाच भगवा फडकायला हवा. बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर मुंबईत शिवसेनेचा झेंडा पुन्हा दिसायला हवा.
भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला की, “राग, लोभ, मान-अपमान बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला शिंदेंनी 100 टक्के पाठिंबा दिला पाहिजे.” पाठिंबा स्वीकारायचा की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण तो दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे आपली शिवसेना खरी असल्याचा दावा करतात, यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कडक शब्दांत टोला लगावला. ते म्हणाले की, “शिवसेनेला जन्म कुणी दिला? बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि त्यांचे सुपुत्र कोण? उद्धव ठाकरे.” शेवटी कोण खरा वारसदार आहे हे जनतेला माहिती आहे, असं सांगत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यात तुम्ही मध्यस्थी करणार का? असा प्रश्न विचारला असता, भास्कर जाधव यांनी थेट उत्तर न देता सूचक प्रतिक्रिया दिली. “काही गोष्टी माध्यमांतून सांगून होत नाहीत. काही प्रश्न समोरासमोर बसूनच सोडवावे लागतात,” असं म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली.
भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. विशेषतः बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचा मुद्दा पुढे करत त्यांनी शिंदे गटासमोर नैतिक आणि राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.