Bhandup News Pudhari
मुंबई

Bhandup News: वऱ्हाडी पडले पाण्याच्या टाकीत; छेड काढणाऱ्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने दुर्घटना

एकाचा मृत्यू , आठ जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: लग्नात आलेल्या एका तरुणीची अनोळखी इसमाने छेड काढल्याने त्याचा पाठलाग करीत असताना एका निर्माणधीन इमारतीत पाण्यासाठी खोदलेल्या टाकीत दहा वऱ्हाडी पडले. यातील एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री अकाराच्या सुमारास भांडुप येथे घडली.

भालचंद्र गणेश पल्ले (25) यांचा या दुर्घटनेते मृत्यू झाला आहे. इतर जखमींपैकी दोघांची प्रकृती स्थर असून आठ जणांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. निवासी भागाच्या इतक्या जवळ असलेला हा खोल खड्डा सुरक्षेच्या उपाययोजनांशिवाय उघडा का ठेवण्यात आला, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे.

भांडुप पश्चिम येथील मातोश्री हॉलमध्ये गुरुवारी एका लग्नासाठी मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळी जमली होती. रात्री एका तरुणीची अनोळखी इसमाने छेड काढली. वऱ्हाडी मंडळींच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या छेड काढणाऱ्या इसमाला पकडून चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने वऱ्हाडी मंडळींना गुंगारा देत बाजूला काम सुरू असलेल्या एका एसआरए इमातीच्या दिशेने धाव घेतली.

इमारतीच्या तळ मजल्यावर पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्याचा कोणालाही अंदाज नव्हता. याच ठिकाणी छेड काढणारा आणि वऱ्हाडी मंडळी पोहचली. यावेळी तोल जाऊन एक वऱ्हाडी या टाकीत पडला. त्याला वाचण्यासाठी अन्य सहा वऱ्हाडी आणि इमारतीत काम करणारे दोन कर्मचारी या टाकीजवळ आले. मात्र ते देखील या टाकीत पडले. त्यांना प्रयत्न करून देखील टाकीच्या बाहेर निघता येत नव्हते.

यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी भांडुप पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन जवानांनी टाकीत पडलेल्या सर्वांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच भालचंद्र याचा मृत्यू झाला होता.

जखमींची नावे

  • अनिकेत महेश पाटील, (21 वर्षे, किरकोळ दुखापत)

  • श्रेयस संदीप सुर्वे (25 वर्षे, किरकोळ दुखापत)

  • ऋषिकेश केशव कदम ( 25 वर्षे, किरकोळ दुखापत)

  • आदित्य शिवाजी आहेर ( 25 वर्षे, किरकोळ दुखापत)

  • संकेत नामदेव जुवाटकर ( 25 वर्षे, किरकोळ दुखापत)

  • जयदत्त पंचानंत श ( 21 वर्षे, बांधकाम कामगार किरकोळ दुखापत)

  • अंकित कुमार रॉय (19 वर्षे, बांधकाम कामगार, किरकोळ दुखापत)

  • कामगार हरिशंकर पासवान (25 वर्षे, मुलुंड जनरल रुग्णालयात उपचार सुरु)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT