

राजकुमार भगत
उरण: महिलांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप असलेला नाशिकचा कुप्रसिद्ध भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कमाईचा नवा पुरावा रायगड जिल्ह्यात उरणमध्ये समोर आला आहे. खरातची पत्नी कल्पना खरात हिने उरणच्या चाणजे परिसरात 20 गुंठे जमीन संशयास्पदरितीने खरेदी केल्याचे उघड झाले असून, उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी हा बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहार रद्द केला आहे.
खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. या तपासात खरातने गैरमार्गाने कमावलेल्या पैशातून विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे समोर येत आहे. खरातने आपली पत्नी कल्पना हिच्या नावाने उरण येथील चाणजे महसुली हद्दीतील सर्वे नं. 371/3 मध्ये 20 गुंठे जमीन खरेदी केली होती.
या जमिनीचा खरेदी व्यवहार 12 मार्च 2026 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला गेला आणि 17 मार्च 2026 रोजी तलाठी कार्यालयात याची नोटीस प्रसिद्ध झाली. 13 एप्रिल 2026 रोजी फेरफार मंजुरीची प्रक्रियाही सुरू झाली होती.
कोट्यवधी रुपये कमावण्याचा खरातचा डाव
बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 3 कोटी रुपयांच्यावर असताना, हा व्यवहार कागदोपत्री केवळ 58 लाख 50 हजार रुपयांत दाखवण्यात आला आहे. सिडकोच्या भू-संपादानात ही जमीन येत असल्याने आणि परिसरात करंजा मच्छीमार बंदर, रेवस करंजा सागरी सेतू यांसारख्या विकासकामांमुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत.
सिडकोच्या साडेबावीस टक्के परतावा योजनेचा लाभ घेऊन कोट्यवधी रुपये कमावण्याचा खरातचा हा डाव होता, अशी चर्चा आता या परिसरात आहे.राजकीय वरदहस्ताचा वापर करून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अशा प्रकारे लाटल्या गेल्या असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
चौकशीमुळे शासकीय गोटात खळबळ
उरण परिसरातील जमिनी सिडकोला वर्ग केल्यास उलवे सारख्या मोक्याच्या ठिकाणी विकसित भूखंड मिळतात, ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असते. शेतकऱ्यांकडून लाखात जमिनी विकत घेऊन सरकारकडून कोट्यवधींचे भूखंड लाटण्याचे मोठे रॅकेट यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. आता अनेक राजकीय नेते, शासकीय उच्चपदस्थांचे धाबे दणाणले आहेत.