

नमिता धुरी
मुंबई: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी साहित्यिकांच्या मदतीने नवा अभ्यासक्रम तयार करण्याचा घाट राज्य शासनाने घातलेला असताना पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
राज्य मराठी विकास संस्थेने मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करून घेतला होता. या अभ्यासक्रमाबाबत रिक्षा-टॅक्सी चालक पूर्णत: अनभिज्ञ आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने काही वर्षांपूर्वी माय मराठी हा अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमात अमराठी भाषकांना सहा पातळ्यांमध्ये मराठी शिकवले जाते. याच पद्धतीने अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचा लघु अभ्यासक्रम तयार करण्याची शिफारस राज्य मराठी विकास संस्थेने केली होती. तसा अभ्यासक्रम जर्मन विभागाने तयार करून संस्थेकडे सुपूर्द केला; मात्र प्रत्यक्षात रिक्षा-टॅक्सी चालकांपर्यंत हा अभ्यासक्रम पोहोचवण्याबाबत शासन उदासीन राहिले.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन येथे 2015 साली 100 अमराठी अधिकारी व कर्मचारी यांना राज्य मराठी विकास संस्थेतर्फे माय मराठी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले. 2016 साली इस्राईलच्या तेल अविव विद्यापीठात आणि 2019 साली तंजावूरच्या तमिळ विद्यापीठात हा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षण वर्गांमध्ये 2020 सालापर्यंत 118 जण सहभागी झाले होते. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठीच्या लघु अभ्यासक्रमासाठी मात्र शासनाने कोणतेही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले नाहीत.
नव्या अभ्यासक्रमाची गरज का ?
जर्मन विभागाने तयार केलेला अभ्यासक्रम शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यात आला आहे; मात्र तो फारच दीर्घ स्वरुपाचा असल्याचे आणि म्हणूनच केवळ काही दिवसांत शिकता येईल असा अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले जाते. यात चालकांना काही मोजकी वाक्ये शिकवली जातील. परिणामी, शालेय शिक्षणातील मराठी सक्तीची जी अवस्था झाली तीच अवस्था चालकांबाबतच्या मराठी धोरणाची होईल, अशी शक्यता आहे.
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी विशेष अभ्यासक्रम शासनाने आमच्याकडून तयार करून घेतला होता. शासनाने सांगितल्यास आम्ही या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करू शकतो. इतर अमराठी लोकांना मराठी शिकवण्यासाठी माय मराठी हा सहा पातळ्यांचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात ऑनलाइन उपलब्ध आहे; मात्र अनेक अमराठी लोकांना याबाबत माहिती नाही.
- विभा सुराणा, जर्मन विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ