Bhandup Station Rickshaw Ban Pudhari
मुंबई

Bhandup Station Rickshaw Ban: भांडुप स्थानकावर रिक्षांना बंदी; सीमारेषा ओलांडल्यास ₹1500 दंड

बेस्ट बस अपघातानंतर प्रशासनाची कडक कारवाई; वाहतूक कोंडीवर आळा, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर दोन महिन्यापूर्वी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही स्टेशबाहेरील गर्दी कमी झालेली नाही. यात मुख्यत्वे रिक्षांमुळे ही कोंडी होत असल्याने आता स्टेशनपर्यंत रिक्षा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

रस्ते मोकळे करणे, फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर अंकुश ठेवणे या काही उपाययोजनांसह काही महत्त्वपूर्ण पावले प्रशासनाने उचलली गेली आहेत. परंतु, स्थानकाबाहेरील रिक्षावाल्यांच्या गर्दीला रोखण्यात अपयश आले. त्यामुळे भांडुप पश्चिमेला स्थानकापासून ठराविक अंतरावर प्रशासनाने सीमा रेषा आखली आहे. या सीमारेषेपुढे येणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांकडून दीड हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. भांडुप स्थानकाबाहेर केलेल्या या उपाययोजनेमुळे वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, बेस्ट बसचा धोकादायक वळणाचा प्रश्न अद्याप कायम आहे.

बेस्ट बस अपघातापूर्वी भांडुप स्थानक परिसर पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे अपघातानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत स्थानक परिसरात कुणालाही बसू दिले नाही. त्यामुळे रोज गर्दीतून वाट काढणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तरीही बस थेट प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथवरून वळण घेताना आजही दिसते. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न कायम आहे.

भांडुप स्थानकावर जाणे म्हणजे प्रवाशांसाठी मोठी कसरत असते. कसेबसे मार्गक्रमण करून स्टेशन गाठावे लागत आहे. रिक्षा चालकांना स्टेशनजवळ जाण्यास बंदी घालणे स्वागतार्ह आहे. यामुळे फार नाही पण काही प्रमाणात तरी दिलासा मिळणार आहे. रिक्षाचालकांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे येथील रहिवाशी अशोक अहेर यांनी सांगितले.

भांडुप स्टेशन फलाट क्रमांक 1 वरील छताचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने अर्ध्या फलाटावर प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. काही प्रवासी आपल्याकडील छत्री किंवा शेडचा आधार घेताना दिसतात, तर काही जण उन्हापासून बचावासाठी जवळच्या छपराखाली थांबतात आणि ट्रेन येताच धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT