Bhandup Bus Accident Pudhari
मुंबई

Bhandup Bus Accident: भांडुप बस अपघात चालकामुळे; तांत्रिक दोष नाही – आरटीओ तपासणी

इलेक्ट्रिक बस यांत्रिकदृष्ट्या सक्षम, अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाला, आरटीओचे निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : गेल्या आठवड्यात भांडुप येथील बस अपघात तांत्रिक कारणाने झाल्याचा बेस्ट चालकाचा दावा खोटा ठरला आहे. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नाही, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाल्याचे समोर आले आहे.

आरटीओच्या तपासणी अहवालानुसार, वाहन यांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचे आढळून आले. ब्रेकिंग सिस्टीम, हँडब्रेक, एक्सिलेटर किंवा ट्रान्समिशनमध्ये कोणतीही समस्या आढळली नाही. बसमध्ये तपासणीदरम्यान कोणतीही तांत्रिक त्रुटी आढळली नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावडे यांनी सांगितले.

चालक संतोष रमेश सावंत (52) याने बस सदोष हँडब्रेकमुळे अनपेक्षितपणे हलली आणि अपघात झाला, असा दावा केला होता.

पोलिसांनी सांगितले की, आरटीओच्या निष्कर्षांमुळे या अपघातात चालकाची महत्त्वाची भूमिका होती हे सिद्ध झाले आहे. ‌‘कोणताही यांत्रिक दोष आढळला नाही, त्यामुळे आता तपास मानवी चुकांवर आणि मानक कार्यपद्धतींचे पालन करण्यावर केंद्रित असेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चालक सावंत यांनी सातत्याने निष्काळजीपणा नाकारला आहे. त्यांना देण्यात आलेल्या वाहनाच्या स्थितीला जबाबदार धरले होते.

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, मागील चालकाचे जबाब नोंदवण्यात आले असून ते आरोपपत्रात वापरले जातील.

इलेक्ट्रिक बस चालकांना प्रशिक्षण

भांडुप रेल्वे स्टेशन पश्चिमेला झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर इलेक्ट्रिक बसचालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा साक्षात्कार बेस्ट प्रशासनाला झाला आहे. या विशेष प्रशिक्षणामध्ये डिझेल बस आणि इलेक्ट्रिक बस चालवण्यामध्ये असलेल्या फरकाची जाणीव चालकांना करून दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT