मुंबई : बेस्ट उपक्रमातून गेल्या दीड वर्षात सेवानिवृत्त झालेल्या 2 हजार 900 कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळालेली नाही. एवढेच नाही तर शिल्लक रजेचे पैसेही मिळालेले नाहीत. आमच्या घामाचे पैसे आम्हाला वेळेत मिळणार नसतील तर, काय फायदा असा सवालही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असून मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानावर उपक्रमाचा कारभार चालवला जात आहे. उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन 2025-26 आर्थिक वर्षात 1 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.
ही रक्कम उपक्रमास पायाभूत सुविधांचा विकास, भांडवली उपकरणाची खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्त्वावरील नवीन बसेस घेणे, वेतन करार अन्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व अन्य विविध देणे देण्यासाठी असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु बेस्टमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी मिळत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, बेस्टमधून 1 ऑक्टोबर 2022 ते 1 मे 2024 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या 3 हजार 315 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 58 टक्के रक्कम मिळाली आहे. यात ग्रॅच्युईटीची सर्व रक्कम मिळाली आहे. अन्य थकबाकी मिळणे बाकी आहे. यात ग्रॅच्युईटीची थकबाकी आहे.
हक्काच्या पैशांसाठी पायपीट सुरूच
सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे आराम करण्याचे वय असते. पण अशा कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी बेस्ट मुख्यालयात पायपीट करावी लागत आहे. परंतु बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून महापालिकेने पैसे दिले तरच आपली देणी देणे शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे.