मालाड : मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक 7 येथील शौचालयालगत तब्बल पाच ते सहा फूट उंचीचे कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिल्याने परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. प्लॉट क्रमांक 4, नवीन कलेक्टर कंपाऊंड येथील शौचालय बांधकामानंतर कंत्राटदाराने डेब्रिज न उचलल्याने येथे प्रथम बांधकामाचा मलबा साचला आणि त्यानंतर नागरिकांनी टाकाऊ वस्तू व इतर कचरा टाकण्यास सुरुवात केली. परिणामी आज येथे प्रचंड कचऱ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे शौचालयात ये-जा करताना नागरिकांना वाट शोधावी लागत आहे. दुर्गंधी, घाण आणि डासांचे वाढते प्रमाण यामुळे परिसरातील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. डासांच्या प्रचंड वाढीमुळे आजारांचा धोका वाढला आहे. उंदीर, घुशींचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे उंदीर घरात शिरून सामानाचे नुकसान करत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
स्थानिक रहिवासी तारीख शेख यांनी महापालिकेच्या हेल्पलाइनवर अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत. परंतु त्यांच्या मते, महापालिकेकडून फक्त नाममात्र कचरा उचलण्याचा देखावा केला जात असून कचऱ्याचा डोंगर मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक तक्रारी करूनही महापालिका कारवाई करत नसल्याने रहिवासी हतबल झाले आहेत.
आमच्या आरोग्याचा बळी द्यायला आम्ही किती दिवस तयार राहायचे, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कचरा पूर्णपणे हटवण्याची आणि परिसर स्वच्छ करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.