BEST Solar Power Agreement Pudhari
मुंबई

BEST Solar Power Agreement: मुंबईकरांची वीज स्वस्त होणार? बेस्टचा २५ वर्षांचा सौरऊर्जा करार; वर्षाला १०० कोटी बचतीचा दावा

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी करार; ₹२.९४ प्रति युनिट दराने हरित ऊर्जा मिळणार असल्याचा बेस्टचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट उपक्रमाने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी २२० मेगावॅट सौरऊर्जा व ११० / ४४० मेगावॅट अवर ऊर्जा साठवणूक प्रणालीसह ऊर्जा खरेदी करण्यासाठीचा वीज खरेदी करार केला आहे.

या करारामुळे बेस्ट उपक्रमास २ रुपये ९४ पैसे प्रती युनिट या दराने २५ वर्षांच्या कालावधीसाठी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे बेस्टला वर्षाला १०० कोटीचा फायदा होणार असून मुंबईकरांना वातावरणात कार्बन उत्सर्जन कमी ठेवण्यास साह्य करणारी स्वस्त आणि स्वच्छ सौर ऊर्जा मिळणार असल्याचा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे. बेस्टकडून सौर ऊर्जेचा संध्याकाळी पुरवठा केला जाणार असून बेस्टचे वीज दर कमी ठेवण्यात मदत होणार आहे.

बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत 'सोलर वीज खरेदी'चा प्रस्ताव चर्चेसाठी मांडण्यात आला. त्यावर समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकत घेत, हा प्रस्ताव अपूर्ण असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर प्रशासनाकडून या प्रस्तावाबाबत तोंडी माहिती देण्यात आली.

हा प्रस्ताव केंद्राकडून असल्याने तो राज्यांना बंधनकारक आहे. या विजेचे दर आणि टेंडरिंग सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करणार आहे.

मुंबईकरांना स्वस्त- स्वच्छ सौर ऊर्जा...

या करारात खासगी वीज कंपन्यांकडून निर्माण केलेली सौर ऊर्जा दिवसभर साठवली जाणार आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी विजेचा बेस्ट उपक्रमाकडून पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जास्तीची मागणी असलेल्या ग्राहकांना ती देणे सहज शक्य होणार आहे. हा करार पुढील २५ वर्षांसाठी म्हणजे २०५१ पर्यंत असणार आहे.

या करारामुळे वीज पुरवठा अधिक सक्षम आणि सुलभ होऊन बेस्ट उपक्रमाला वर्षाला १०० कोटींचा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील २५ वर्ष स्वस्त आणि स्वच्छ सौर ऊर्जेचा पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे बेस्टचे मुख्य अभियंता सुरेश मकवाना यांनी सांगितले.

अशी होणार वीज बचत...

या प्रकल्पांतर्गत दिवसा मिळणारी सौर ऊर्जा आणि संध्याकाळी १८ ते २४ या वेळेत सर्वाधिक मागणीच्या काळातील विजेची मागणी 'विद्युत ऊर्जा साठवणूक प्रणाली' किफायतशीर दरात पूर्ण करेल.

यासाठी टाटा पॉवर आणि साईवर्धा औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेस्टच्या गरजेनुसार चालवले जाणार आहेत. यामुळे अल्पकालीन नवीन वीज खरेदीची जागा २५ वर्षासाठी निश्चित दर असलेल्या दीर्घकालीन वीज खरेदीने घेतली जाईल. परिणामी, वीज बचत होऊन महागाईमुळे दरात कोणतीही वाढ होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT