Mumbai Public Transport News
मुंबई : तिकीटदरात वाढ केल्यानंतर लाडक्या बेस्टवर प्रवासी चांगलेच रुसल्याचे दिसत आहे. 9 मेपासून किमान 10 रुपये तिकीट केल्यापासून महिनाभरात 5 लाख प्रवासी घटले आहेत. असे असले तरी बेस्टच्या तिजोरीत 74 कोटींची भर पडली आहे. तिकीटदरात वाढ केली, मात्र बसच्या फेर्याही अपुर्या आहेत. त्यामुळे प्रवासी पर्यायी वाहनाने प्रवास करीत आहेत.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. मुंबई महापालिकेने 2016 पासून आतापर्यंत 11 हजार कोटींची आर्थिक मदत बेस्टला केली आहे. मात्र तरीही बेस्टचा ताळेबंद काही जागेवर येत नाही. प्रवासीसंख्या वाढली तर बेस्टला हातभार लागेल या आशेने बस्टने राज्य शासनाच्या आदेशाने 9 जुलै 2019 रोजी भाडे कमी केले होते. त्यामुळे प्रवासीसंख्या 17 लाखांवरून 31 लाखांपर्यंत गेली. मात्र आर्थिक तोटा काही भरून आला नाही. त्यामुळे बेस्टने पुन्हा दुपटीने तिकीटदर वाढवले आहेत. 9 मेपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र तिकीट कमी असल्याने लाडक्या झालेल्या बेस्टवर प्रवासी रुसले आहेत. महिनाभरात पाच लाख प्रवाशांनी बेस्टचा प्रवास टाळला आहे. उत्पनात मात्र 74 कोटींची भर पडली आहे.
बेस्ट उपक्रमाने भाडेवाढ केली असली तरी बस गाड्या वाढविल्या नसल्यामुळे प्रवाशांचा बसची तासनतास वाट पाहण्याचा त्रास कमी झालेला नाही. त्यामुळे जवळचे प्रवासी बसच्या तिकीट दराइतके पैसे देऊन शेअर रिक्षाने रेल्वे स्टेशन गाठत आहेत. त्यामुळे बेस्टचे प्रवासी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
भाडेवाढ झाली त्या दिवशी बसच्या ताफ्यात 2,721 बसगाड्या होत्या. त्यात बेस्ट उपक्रमाच्या अवघ्या 602 व उर्वरित भाडेतत्त्वावरील 2593 बसगाड्या आहेत. आता बेस्टच्या अवघ्या 436 बसगाड्या आहेत. म्हणजे महिनाभरात बेस्टच्या ताफ्यातून एकूण 128 बसेस कमी झाल्या आहेत. तसेच बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यातील 166 बस कमी झाल्या आहेत. दरम्यान, डिसेंबर 2025 अखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील वातानुकूलित 2500 बसगाड्या येण्याची बेस्ट प्रशासनाला अपेक्षा आहे.