

मुंबई : बेस्ट बसची भाडेवाढ अखेर शुक्रवार (9 मे) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 5 रुपये असलेले किमान भाडे 10 रुपये तर वातानुकूलित बसचे किमान भाडे 6 रुपयावरून 12 रुपये होणार आहे.
बेस्ट उपक्रमाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अखेर मुंबईकरांवर भाडेवाढ लादण्यात आली आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव रिजनल ट्रॅफिक ऑथॉरीटीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. याला गुरुवारी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही भाडेवाढ शुक्रवारपासून लागू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत पाच किमीपर्यंत वातानुकूलित बसमधून सहा रुपयात थंडगार प्रवासासाटी आता 12 रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टचा लांब पल्ल्याचा प्रवासही महागला असून 25 किमी प्रवासासाठी 35 रुपये मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत पाच किमी प्रवासासाठी 300 रुपये मासिक पास होता. तो आता 500 रुपये होणार आहे.
बेस्टचे किमान भाडे दुपटीने वाढल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात प्रवाशांची संख्या 29 लाख 35 हजारावर पोहचली होती.
शेअर टॅक्सीला किमान भाडे दहा रुपये इतके आहे. इतकेच भाडे बेस्ट बस प्रवासासाठी मोजावे लागणार आहे. त्यामुळे अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा न करता शेअर टॅक्सीला पसंती देतील अशी शक्यता आहे.