

Mumbai BEST Bus Fare Hike
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील नागरिकांसाठी लोकलसोबतच बेस्ट बस ही देखील एक महत्वाची परिवहन सेवा आहे. बेस्टला मुंबईकरांची जीवनवाहिनीही म्हटले जाते. या बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. या निर्णयाला प्रशासनाकडूनही परवानगी मिळाल्याने ही दरवाढ आता लागू होणार आहे.
त्यावर आता राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बेस्टच्या या दुप्पट दरवाढीला आदित्य ठाकरे यांनी जोरदार विरोध केला आहे. त्यांनी या संबंधीचे ट्वीट करून आपला विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हंटलंय की, बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावली आहे. महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
पुढे आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा अशी भूमीका त्यांनी मांडली आहे. त्यावरून आता बेस्टच्या दरवाढीचे राजकारण रंगणार असल्याचे दिसून येत आहे.