श्रीकांत जाधव
मुंबई: तुटीतून तुटीकडे प्रवास करणाऱ्या बेस्ट उपक्रमाचा २०२७-२८ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प बुधवारी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा बेस्टच्या प्रभारी महाव्यवस्थापक प्राजक्ता वर्मा यांनी सादर केला.
१ हजार ३१७ कोटी रुपयांची तूट असूनही या अर्थसंकल्पात मुंबईकर प्रवाशांवर कोणतीही बस भाडेवाढ लादलेली नाही. उलट बेस्टचा प्रवास सुकर व्हावा म्हणून अनेक नव्या योजना या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महानगरपालिकेकडे ९ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
बेस्ट परिवहन आणि बेस्ट विद्युत ही या उपक्रमाची दोन अंगे असली तरी त्यांची परिस्थिती परस्परांच्या विरुद्ध आहे. बेस्ट इलेक्ट्रिसिटीने उत्पन्न ५००७.५१ कोटींचे दाखवले असून, तुटीतही बेस्ट प्रवास स्वस्तच!
खर्च ४८०६.३० कोटींचा दर्शवला आहे. त्यानुसार बेस्ट विद्युत पुरवठा विभाग २०१.२१ कोटींनी शिलकीत दिसतो. अर्थात या नफ्याचा आनंद मानावा अशी स्थिती बेस्ट परिवहनने ठेवलेली नाही. बेस्ट परिवहन विभागाचे अंदाजित उत्पन्न ३५५१.५५ कोटी रुपये असून, खर्च मात्र ४७०२.२६ कोटी रुपये आहे.
ही तूट १५१८.७१ कोटी रुपये येते. तुटीचा हा ताण आणि तब्बल ४५३० कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर डोक्यावर असतानाही बेस्टच्या या अर्थसंकल्पात मुंबईकर प्रवाशांना सुकर प्रवासाचे स्वप्न दाखवणारे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत.
१० हजार बसचा ताफा येतोय
सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत बेस्टकडे २,६३४ बस गाड्या होत्या.पीएम-ई-बस योजनेअंतर्गत आणखी १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार आहेत. शिवाय २०० मिडी सीएनजी बसगाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय मुंबई दर्शन घडवण्यासाठी खुले छत असलेल्या डबल डेकर बसही आणण्याचा विचार जाहीर करण्यात आला आहे.
बेस्ट बसचे डिजीटल तिकीट
वन टिकीट ॲपवरून प्रवाशांना बसचे डिजीटल तिकीट काढता येईल, अशी योजना आखली जात आहे. पेटीएम, फोन पे, व्हाट्स ॲप, रेड बस आणि रॅ.पिडो अशा माध्यमांतूनही हे तिकीट काढता येऊ शकेल.
बेस्टची एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली याच आर्थिक वर्षात कार्यान्वित करण्याचे बेस्टचे नियोजन आहे.यामुळे बससेवेचे रिअल-टाइम निरीक्षण, बस ट्रॅकिंग, मार्ग व वेळापत्रकाची माहिती तसेच प्रवास नियोजन अधिक सुलभ होणार आहे.
चालकांना प्रशिक्षण
अलीकडे बेस्ट बस सतत होणारे अपघात आणि लागणाऱ्या आगी यामुळेच अधिक चर्चेत असते. बेस्टच्या चालकांना अधिक सुरक्षित वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर उभारण्यात येणार आहे.
बेस्ट वीजपुरवठा सुधारणार
जुन्या ऊर्जा रोहित्रांसह सर्किट ब्रेकर बदलणे तसेच नवीन विद्युत वितरण उपकेंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी नवीन ५० किमी सर्व्हिस बदली केल्या जाणार आहेत. तसेच प्रगत वितरण प्रणाली ची अमंलबजावणी केली जाणारा आहे.
भारत आणि पोदार मिल, अरण्य टॉवर, न्यू हिंद मिल, श्रीराम मिल याठिकाणी प्रत्येकी ७ आणि ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन ३३/११ के व्ही संग्राही उपकेंद्र कार्यन्वित केले जाणार आहे.
अँटॉप हिल टर्मिनल्स, लव्ह ग्रोव्ह येथे उपकेंद्र आणि लोढा क्राऊन टी- ६ तसेच लव ग्रोव्ह विद्द्युत संग्राही उपकेंद्र प्रस्तावित आहेत.
कुलाबा बेस्ट भवन येथे झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत प्राजक्ता वर्मा यांनी हा अर्थसंकल्प समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना सादर केला. बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी उपस्थित नसणे याचीही चर्चा बेस्ट वर्तुळात आहे.
मागील दोन वर्षांचा अर्थसंकल्प
आर्थिक वर्ष २०२५- २६ : ७,४० कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प
आर्थिक वर्ष २०२६-२७ : १,१८२ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प
आर्थिक वर्ष २०२७-२८ : १,३१७.५० कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प