BEST bus employees Pudhari
मुंबई

BEST Employees Diwali Bonus: बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस ३३ हजार रुपये; ३ नोव्हेंबरला पगारही जमा होणार

२२ हजार ६५४ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ; गेल्या वर्षीपेक्षा दोन हजार रुपयांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची ठरणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना येत्या ३ नोव्हेंबर रोजी ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच, १० नोव्हेंबर रोजी होणारा कर्मचाऱ्यांचा मासिक पगारही ३ नोव्हेंबर रोजीच केला जाणार असल्याची माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

बेस्ट उपक्रमातील एकूण २२ हजार ६५४ कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी पालिकेकडून आर्थिक मदत अपेक्षित असून सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. तसेच, वेटलिज कामगारांसाठीही त्यांच्या कंत्राटदारांनी बोनसची तरतूद करावी, अशी विनंती केली जाणार असल्याचे लाड म्हणाले.

गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यातुलनेत यंदाच्या बोनसमध्ये वाढ मिळावी यासाठी बेस्ट समितीकडून वारंवार मुंबई महापालिकेशी चर्चा सुरू होत्या. तसेच विविध कामगार संघटनांकडून प्रयत्न केले जात होते.

आमदार प्रसाद लाड यांनी ही श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससंदर्भात चर्चा केली.

त्यावर कर्मचाऱ्यांना बोनस तत्काळ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला निर्देश दिले. यानंतर आमदार लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांची भेट घेत त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीचे पत्र सादर केले आणि बोनसचीही घोषणा करुन टाकली.

बेस्ट कामगार संघटनांकडून स्वागत

नारायण राणे यांच्या समर्थ कामगार संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दोन हजार रुपये जास्त बोनस मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. समर्थ कामगार संघटनेचे हे यश असल्याचे सरचिटणीस विलास पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून यंदाची बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली असल्याचे बेस्ट कर्मचारी सेनेचे ॲड. उदयकुमार आंबोणकर यांनी सांगितले.

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. यापेक्षा मोठा आनंद काय नसल्याची प्रतिक्रिया बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी व्यक्त केली आहे.

बेस्ट प्रशासनातील वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार, मुंबई महापालिकेने बोनसची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बेस्ट समिती अध्यक्षांकडून कर्मचाऱ्यांच्या अधिकृत बोनसची घोषणा केली जाते.

मात्र, यंदा त्याआधीच योग्य टायमिंग साधत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट भवनात कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला. यावरून राजकीय श्रेयवादाची चर्चा सुरू होताच, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी शुक्रवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान, यावेळी उपस्थित असलेले बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी या संपूर्ण प्रकारावर तीव्र हरकत घेतली. बेस्ट समिती अध्यक्षांच्या अधिकृत घोषणेपूर्वी परस्पर अशी घोषणा न करण्याचा नियम सरकारमधील सर्वांनीच पाळला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी प्रसाद लाड यांना लगावला. यावेळी सदस्य सुनील गणाचार्य सुद्धा उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT