

ठाणे: उबाठा शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी गुरुवारी दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. हे नेते पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन माघारी फिरल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी मानपाडा-कापूरबावडी परिसरात कॉम्बिग ऑपरेशन राबवून तरुणांना ताब्यात घेतले. यावेळी दोन तरुणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाका कामगार म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला दोन पोलिसांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात आणून त्याची पॅन्ट उतरवायला लावून त्याच्या प्रायव्हेट पार्टला इजा पोहचवली. दोन्ही तरुणांना नको ते कृत्य करायला भाग पाडले. त्यानंतर पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्या पिडीतासह, राम पूर्णेकर यांनी केला आहे.
तसेच या पीडित तरुणाने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्यास आवारातच त्यास अमानुष मारहाण झाल्याचे व्रण पत्रकारांसमोर दाखवले. कापूरबावडी पोलिसांकडून परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आल्यानंतर काही लहान मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
पोलिसांनी २५० आंदोलनकर्त्यांची यादी बनवली असून ती माहिती पोलीस आयुक्तांनाही दिलेली आहे. राजा शिंदे यांच्या सोबत नृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने दगडफेक केल्याची छायाचित्रासह माहिती पोलिसांना दिलेली आहे. असे असताना पुलाखाली काम करणाऱ्या तरुणाला पकडून त्याला मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित मुलांना न्याय मिळावा, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पीडित तर्फे अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, पीडित तरुणाला मेडिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणी मध्ये तरुणाच्या प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी गंभीर जखम झाल्याचे प्राथमिक तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
साध्या गणवेशात पोलिसांनी केली अमानुष मारहाण
मी कापूरबावडी नाक्यावर उभा असताना साध्या वेशातील दोन पोलीस तेथे आले. त्यांनी एक फोटो मला दाखवला व या व्यक्तीस तू ओळखतो का असे विचारत पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या पोलिसांनी मला माझी पॅन्ट उतरवून डोक्यावर घालायला सांगत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोपही पीडित तरुणाने केला.