नवी मुंबई : बेलापूर येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा बदलावी किंवा प्रकल्पच रद्द करावा, असा प्रस्ताव महासभेत मांडून भाजपच्या 65 नगरसेवकांनी आग्रही भूमिका मांडत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी त्या चांगल्याच बरसल्या.
नवी मुंबई कोणाची खासगी मालमत्ता नाही. कितीही अडथळे आले तरी मागे हटणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार हे हॉस्पिटल त्याच जागेवर होणार असे प्रतिउत्तर त्यांनी दिले आहे.
या प्रकल्पाच्या कामात येत असलेल्या अडथळ्यांबाबत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक गटावर जोरदार टीका केली. हे रुग्णालय व्हावे ही सर्वसामान्यांची गरज आहे. काही लोक (नाईक गट) जाणीवपूर्वक न्यायालयात जाऊन किंवा तांत्रिक अडचणी निर्माण करून या कामाला ब्रेक लावत आहेत. या रुग्णालयासाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, सत्तेचा वापर करून विकासकामांमध्ये अडथळे आणण्याची जुनी पद्धत अजूनही सुरू असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
स्वतःच्या काळात कामे करायची नाहीत आणि दुसऱ्याने केलेली कामे रोखायची, ही प्रवृत्ती शहराच्या विकासासाठी घातक आहे. न्यायालयीन प्रक्रियेत योग्य ती बाजू मांडून हॉस्पिटलचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव घेऊन त्यांना राजकारणात समोरासमोर येण्याचे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मर्दासारखे समोर येऊन लढा
सिडकोची खेळाची मैदाने बिल्डरांच्या घशात घातली गेली, असा आरोप करीत विरोध करणारे आमचेच लोक आणि आमचेच नेते आहेत. ते स्वतः समोर येत नाहीत, तर त्यांनी बांडगुळं पाळली आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते वार करीत आहेत. ‘मर्द असाल तर मर्दासारखे समोर येऊन लढा, असे थेट आव्हानच त्यांनी नाईक गटाला दिले, तर विरोध करणाऱ्या नगरसेवकांची आणि त्यांच्या नेत्यांची अनधिकृत बांधकामे, इमारती आणि गटारांवरील बांधकामे मी आता बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी दिला.