नवी मुंबई : वाढत्या भूस्खलन धोक्याचा इशारा देत सुमारे 200 नागरिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी बेलापूरच्या मुख्य चौकात तिसरी मानव साखळी तयार केली. अनियंत्रित आणि कथित बेकायदेशीर बांधकामांपासून बेलापूर टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपला लढा तीव्र केला आहे.
सेव्ह बेलापूर हिल्स फोरम आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भूस्खलनप्रवण उतारांवर उभ्या असलेल्या सुमारे 30 अनधिकृत बांधकामांविरोधातील प्रशासनाच्या दीर्घकालीन निष्क्रियतेचा मुद्दा मांडण्यात आला. आरटीआयमार्फत सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बांधकामे सुमारे 2.3 लाख चौरस फूट सार्वजनिक जागेवर पसरलेली आहेत.
वृक्षतोड करून जमीन सपाट केल्यामुळे टेकडीची माती सैल झाली आहे. राज्य मानवाधिकार आयोगासमोर दिलेल्या पाडकामाच्या आदेशांनंतरही ही बांधकामे उघडपणे वाढत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सिडको मुख्यालयातून स्पष्ट दिसणाऱ्या या टेकड्या आता प्रशासकीय ठप्पपणाचे प्रतीक बनल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत हे तिसरे आंदोलन आहे.
सेव्ह बेलापूर हिल्स फोरमचे कपिल कुलकर्णी यांनी सांगितले की, 600 हून अधिक घरे थेट या धोकादायक उतारांच्या खाली आहेत.
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने बेलापूर टेकडीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सिडकोने सर्व अनधिकृत धार्मिक मंदिरांचे पुनर्वसन हे स्वतः त्यांना ‘अधिकृत’ भूखंड देऊन योग्य त्या ठिकाणी करावे. पर्यावरणप्रेमींचा विरोध हा धार्मिक स्थळांना नसून पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाला व त्याच्या भविष्यातील सजीव सृष्टी व वनातील पशु, पक्ष्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांना आहे.सुशील पाटील, सदस्य, सेव्ह बेलापूर हिल्स