मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा 5 दिवसाचा आठवडा करावा या मागणीसाठी देशव्यापी संप मंगळवारी (दि.27) होणार आहे. या संपादिवशी मुंबई शहरातील बँक कर्मचारी आझाद मैदानात सकाळी 11 वाजता एकत्रित जमून सरकार व बँक प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन निदर्शने करणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापुरकर यांनी दिली.
2010 ला बँकर्सनी पाच दिवसांचा आठवडा ही मागणी तत्वत: मान्य करत असताना दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी लागू केली. त्यानंतर 11 व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी तत्वतः मान्य करत उर्वरित दोन दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे मान्य केले. 12 व्या द्विपक्ष करारात पुन्हा ही मागणी मान्य करत शिफारशी सह अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला जाईल असे सांगितले. तसा तो प्रस्ताव सरकारला सादर केला. पण दोन वर्षांपासून सरकारने अंमलबजावणीत चालढकल केली. अद्यापही या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. यामुळे बँक कर्मचाऱ्यात संतापाची भावना आहे.
सरकार एकीकडे डिजिटल इंडिया, डिजिटल बँकिंगचे मोठ मोठे दावे करते. पण दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करावयाचा म्हटले की, ग्राहकांची ढाल पुढे करून तो निर्णय घेण्याचे टाळते. सरकार एलआयसी, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबी यासर्वांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करते. पण बँक कर्मचाऱ्यांना लागू करत नाही. यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 27 जानेवारीला एकदिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे.