मुंबई; पुढारी वृत्तसेवा : घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका बांग्लादेशी नागरिकाला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. अख्तरुल इस्लाम इंताअली शेख (३७) असे या बांग्लादेशीचे नाव असून पोलिसांकडून त्याची कसून चाैकशी केली जात आहे.
वडाळा पुर्वेकडील बंगालीपुरा परिसरात एक बांग्लादेशी वास्तव्यास असल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने येथे सापळा रचून संशयित आरोपी अख्तरुल याला ताब्यात घेतले. कॅटर्समध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी वडाळ्यात रहात असल्याचे त्याने सुरुवातीला सांगितले. अख्तरुल हा उडवा -उडवीची उत्तरे देत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी बाग्लादेशमधील संपर्क क्रमांक असलेला एक मोबाईल पोलिसांना मिळाला आणि अखेर अख्तरुल याने आपण बांग्लादेशी असल्याची कबुली दिली.
बाग्लादेशमधील बयलीया (जि. सातखिरा) येथील रहिवासी असलेल्या अख्तरुल याने तेथील उपासमारीला कंटाळून अवैधमार्गाने भारतात प्रवेश केला. जानेवारी २०२१ पासून भारतात वास्तव्यास असून मिळेल ते काम करत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दाखल करुन अख्तरुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.