Devendra Fadnavis file photo
मुंबई

Bangladeshi Illegal Immigrants: बांगलादेशी हद्दपारीत महाराष्ट्र आघाडीवर

‘टिस’ अहवाल चिंताजनक; घुसखोरांचे मुंबईत राहणे अशक्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बांगला देशी घुसखोरांच्या माध्यमातून मुंबईतील वाढती लोकसंख्या चिंताजनक आहे. यासंदर्भातील टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल डोळे उघडायला लावणारा असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केली. बांगला देशी घुसखोरीचा पॅटर्न सरकारच्या लक्षात आला असून, त्याविरोधात परिणामकारक यंत्रणा उभारली जात आहे. देशातील आकडेवारी तपासल्यास बांगला देशींना हद्दपार करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसते. यापुढेही अशी व्यवस्था उभारू, ज्यात अशा अवैध घुसखोरांचे मुंबईत राहणे असंभव होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बांगला देशी घुसखोरी आणि मुंबईतील ‌‘डेमोग्राफी‌’ अर्थात लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याच्या प्रयत्नांवर भाष्य केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात ‌‘टिस‌’च्या अहवालासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. हा अहवाल चिंताजनक असून, डोळे उघडायला लावणारा आहे. बांगला देशींना शोधून काढून त्यांना हद्दपार करण्यात सर्वाधिक वाटा हा मुंबई आणि महाराष्ट्राचा आहे. सरकारच्या प्रयत्नांची जाहिरात करण्याची गरज नाही. हे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी असून, त्यादृष्टीने आमची कारवाई सुरू आहे.

भविष्यातही कारवाई सुरूच राहणार

भविष्यातही बांगला देशी घुसखोरांविरोधातील कारवाई चालूच राहील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या घुसखोरीचे तंत्र सरकारच्या लक्षात आले आहे. ते आधी पश्चिम बंगालमध्ये येतात, तिथे सर्व कागदपत्रे तयार करून मुंबईत येतात. या ‌‘मोडस ऑपरेंडी‌’चा आम्ही अभ्यास केला आहे. जितके लोक पकडले गेले त्यांच्या तपासातून ही पद्धती आणि घुसखोरीचे टप्पे लक्षात आलेले आहेत. त्याआधारे आम्ही अशी व्यवस्था तयार करत आहोत, ज्यामुळे भविष्यात बांगला देशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना शोधून काढणे सहज शक्य होणार आहे. त्यातून अशा घुसखोरांना हद्दपार केले जाईल. ज्यातून अशा लोकांचे मुंबईत राहणे असंभव बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

विशेषतः, मुंबईतील विकसक, बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक हे बांगला देशी घुसखोरांचे ‌‘हॉट बेड‌’ अर्थात वाढीला पोषक ठिकाणे आहेत. त्यामुळे यापुढे केवळ स्वस्त मजूर आणि कामगार मिळतात म्हणून पश्चिम बंगालमधून बांगला देशींना आणाल, तर तुमच्या विरोधातही कारवाई केली जाईल, अशा सूचना या घटकांना दिल्या आहेत. यापुढे ओळख पटविल्याशिवाय आणि पडताळणी केल्याशिवाय मजूर, कामगार आणता येणार नसल्याच्या सूचना या घटकांना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मी मूर्ख ‌‘लिबरल‌’ नाही

ज्या पद्धतीने इथे बांगला देशी येतात आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानची ‌‘आयएसआय‌’ ही आपले हस्तक तयार करते त्याने भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. मी धर्मनिरपेक्ष आणि लिबरल असलो तरी मी मूर्ख ‌‘लिबरल‌’ नाही. स्वतःला लिबरल दाखविण्यासाठी देशाची एकता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोक्यात टाकणारा लिबरल नाही. त्यामुळे काहीजण माझ्यावर, मी धर्मनिरपेक्ष नसल्याचा बोल लावत असतील तरी मला त्याची चिंता नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हिंदू आहे म्हणूनच धर्मनिरपेक्ष ः मुख्यमंत्री

मी धर्मनिरपेक्ष आहे; कारण मी हिंदू आहे. माझ्या धर्माने सर्व धर्मांचा आदर शिकविला आहे. कुठे जाऊन दुसऱ्या धर्माच्या विरोधात ‌‘जिहाद‌’ करायला शिकवले नाही, आदरच शिकविला आहे; पण सर्व मुसलमानांना वाईट म्हणत नाही. चांगले मुसलमानही आहेत, या देशावर प्रेम करणारे आहेत. माझा लढा जे ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ म्हणायला विरोध करतात, जे या देशाला आपला मानत नाहीत त्यांच्याविरोधात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT