Devendra Fadnavis news file photo
मुंबई

Principal Insult Mumbai: सी-लिंकवर मुख्याध्यापकाला ‘पाकिस्तानी’ म्हणत अपमान; मालाडमधील शिक्षकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मालवणीतील शाळेचे मुख्याध्यापक फिरोज शेख यांचा आरोप; घटनेचा व्हिडिओ व्हायरल, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाडमधील मालवणी परिसरातील उत्कर्ष मालवणी मराठी शाळेचे मुख्याध्यापक फिरोज एफ. शेख यांना वांद्रे-वरळी सी-लिंकवरील एका कर्मचाऱ्याने ‌‘पाकिस्तानी‌’ असे संबोधून सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी मुख्यमंत्री तसेच एमएमआरडीए प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फिरोज शेख हे ओला कॅबने वांद्रे-वरळी सी-लिंकमार्गे प्रवास करत होते. त्यावेळी तेथील एका कर्मचाऱ्याने ओला कॅब चालकासह शेख यांना जाणीवपूर्वक ‌‘पाकिस्तानी‌’ असे संबोधत सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीला ‌‘पाकिस्तानी‌’ असे संबोधणे केवळ अपमानास्पद नसून त्यातून देशद्रोही असल्याचा अर्थ सूचित होतो, जे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे शेख यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून असे भेदभावपूर्ण व अपमानास्पद वक्तव्य होणे अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कडक

शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज जतन करून तपासासाठी सुरक्षित ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT