Jarimari Mata Temple Navratri Pudhari
मुंबई

Jarimari Mata Temple Navratri: स्वयंभू जरीमरी माता मंदिरात भक्तीचा जागर; मोगरा, चाफ्याच्या फुलांनी सजविण्यात आला मंदिराचा गाभारा

धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय; फुले आणि खणा-नारळाच्या ओटीने गाभारा सजला

पुढारी वृत्तसेवा

श्रीकांत जाधव

मुंबई: मुंबईच्या उपनगराची ग्रामदेवता असलेल्या वांद्रे पश्चिम येथील स्वयंभू देवस्थान जरीमरी माता मंदिरात यंदा भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्र साजरा होत आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी देवीची आराधना केली जात असून येथे भक्तीचा जागर भरला आहे.

मोगरा चाफ्याच्या सुगंधीत रंगीत फुले आणि खणा नारळाच्या ओटीने सजलेला गाभारा आणि जरीमरी मातीचे तेजस्वी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली आहे.

वांद्रे पश्चिम येथील तलावासमोर श्री जरीमरी मातेचे स्वयंभू मंदिर आहे. हाकेला धावणारी स्वयंभू देवता म्हणून सर्वधर्मियांमध्ये जरीमरी मातेचा लौकिक आहे. मोकळेपणाने भाविकांना थेट देवीच्या गर्भाऱ्यात दर्शन आणि सामूहिक आरतीत सहभाग मिळतो म्हणून येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. यंदाचा नवरात्र उत्सव भक्तिरसाने द्वीगुणित व्हावा म्हणून क्षत्रिय मराठा परीट ज्ञाती मंडळ मंदिर व्यवस्थापन कमिटीने भक्तांच्या श्रद्धेपोटी भरगज्ज कार्यक्रम आखले आहेत.

नवरात्रात जरीमरी मंदिरांची सुंदर अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. आकर्षक रोषणाईने पूर्ण मंदिर सजविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंदिराचा गाभारा मोगरा - चाफ्याच्या सुगंधीत रंगीत फुलांनी सजविण्यात आला आहे.

त्यामुळे जरीमरी मातीचे रूप प्रचंड तेजस्वी भासते. मंदिरात थेट प्रवेश असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो. त्यासाठी मंदिर आणि खाजगी सुरक्षा रक्षकांची चोख व्यवस्था येथे ठेवण्यात आली आहे.

आरती आणि अष्टमीचा महा होम

येथील मंदिरात नवरात्र मंगळवारी, गुरूवारी आणि शुक्रवारी पहाटे होणाऱ्या आरतीसाठी प्रचंड गर्दी असते. संध्याकाळच्या आरतीसाठी सुद्धा भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरासमोर रविवारी ४ वाजता अष्टमीचा महा होम होणार आहे. भाविकांमध्ये या होमचे खूप आकर्षण आहे.

भरगच्च धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

घटस्थापनेच्या पहाटेपासूनच जरीमरी माता मंदिरात सिद्धकला भजनी मंडळाचे विविध कार्यक्रम आहेत. शनिवारी कांदिवलीच्या जय माँ जागरण ग्रुप तर्फे माताजी की चौकी, रविवारी 'द फोक संस्कृती' हा बाळा पांचाळ याचा कार्यक्रम तसेच सोमवारी 'अवघा रंग सुरांचा' हा कार्यक्रम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT