

मुंबई: विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना आवर घालण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना येणाऱ्या अभ्यागतांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अडवले जात नाही मात्र मला भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना अडवले जाते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना जो न्याय, तो मला का नाही? असा सवाल उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केला.
विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना प्रवेश दिला जात नाही. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नियंत्रण आणले आहे. अहिर आणि बनसोडे यांच्याकडे विविध प्रश्नांबाबत बैठका घेण्यात येत आहेत. त्यामुळे विधानभवनात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या अलिकडे वाढली आहे. त्यामुळे प्रवेशांवर निर्बध आणले आहेत.
यावर अण्णा बनसोडे यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील लोक आम्हाला भेटायला येतात त्यावर निर्बध कसे लादले जातात? अजित पवार असते तर निर्बध आणण्याची हिंमत झाली असती का? असा सवाल बनसोडे यांनी केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपण याबाबत तक्रार करणार असल्याचे बनसोडे म्हणाले. तर सचिन अहिर यांनीही प्रवेशाबाबतच्या निर्बधाबाबत नाराजी व्यक्त केली. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.