Crop Loss Help
मुंबई : आधीच संकटात असलेल्या शेतकर्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. म्हणून सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
काही पिके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले. केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, टोमॅटो, कांदा, डाळिंब पिकाचेही नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली. जनावरांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, शेतकरी मोडून पडला आहे. पण सरकारची मदत करण्याची मानसिकता दिसत नाही.
एनडीआरएफच्या निकषाने मदत करायची की एसडीआरएफच्या निकषाने यात शेतकर्याला काही देणेघेणे नाही, त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे. सरकारने 3 हेक्टरचा निकष बदलून 2 हेक्टर केला हे आणखी अन्यायकारक आहे, असे थोरात यांनी सांगितले.
पीकविम्याचे निकष बदलल्याने त्यातूनही फारशी मदत मिळत नाही. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले, पण प्रत्यक्षात प्रशासन काम करताना दिसत नाही. आज कांद्याला एकरी 60 हजार रुपये खर्च येतो, तर टोमॅटोला एकरी 50 हजारांचा खर्च येतो. शेती करणे महाग झाले आहे, असे ते म्हणाले.