Ayushman Bharat Yojana Pudhari File Photo
मुंबई

Ayushman Bharat Hospital Charges: आरोग्य योजनांमध्ये पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई; मंत्र्यांची माहिती

महात्मा फुले व आयुष्मान भारत योजनेत अनियमितता उघड; 338 प्रकरणांत दंड, चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

या संदर्भात काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत प्रश्न केला होता. या चर्चेत सुनील प्रभू, बबनराव लोणीकर आणि रत्नाकर गुट्टे यांनी उपप्रश्न केला. मंत्री आबिटकर म्हणाले की, काही रुग्णालयांकडून अनियमितता झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत राज्यात 338 प्रकरणांमध्ये एकूण सुमारे 60.47 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाविरुद्ध योजना लागू असतानाही तपासण्या व शस्त्रक्रियांसाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या एकूण 12 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीने केलेल्या चौकशीनुसार एका रुग्णास घेतलेले पैसे परत करण्यात आले असून संबंधित रुग्णालयावर नियमानुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. उर्वरित 11 तक्रारींच्या संदर्भात संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून चौकशी सुरू आहे.

तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून समिती स्थापन करण्यात आली असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी जिल्हास्तरावर आढावा बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आयुष्मान भारत योजना समाविष्ट केल्यानंतर उपचारासाठी समाविष्ट आजारांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार उपचार पॅकेजेसमध्येही वाढ करण्यात आली आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एआयच्या माध्यमातून तक्रारींचे परीक्षण करून तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT