मुंबई : अशोक खरात हा केवळ भोंदू बाबा नव्हे तर तो महाराष्ट्राचा एपस्टिन आहे. त्याचे ‘ओष्णोजल’ मिळवण्यासाठी अनेक नेते गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे. त्यात एक तिरूपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी असल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी केला.
मुंबईत कार्यरत असलेला एक उपजिल्हाधिकारी खरातला आर्थिक व कायदेशीर मदत करीत आहे, असे सांगत या अधिकाऱ्याच्या मुलीचा 7/12 आपल्याकडे असून त्यांचे खरात सोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. त्यांच्या एकत्रित जमिनीही असल्याचा दावा दमानिया यांनी केला.
राजकिय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनामे अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत उघड केले. महिलांचे शोषण करणाऱ्या खरातला ‘भोंदू बाबा’ म्हणण्याऐवजी ‘महाराष्ट्राचा एपस्टिन’ किंवा ‘विकृत बाबा’ हे नाव दिले पाहिजे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
खरात हा ‘ओष्णोजल’ बनवायचा. हे ओष्णोजल म्हणजे कफसिरप असून त्यात पाणी आणि व्हायग्रा घालायचा, अशी माहिती मिळाली आहे. हे पाणी घेण्यासाठी राजकारणी नेतेमंडळी आपल्या गाड्या, हेलिकॉप्टर पाठवायचे. त्यातील एक नेता तिरूपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी असल्याचा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला. यातील जी नावे समोर आली आहेत, त्यातील बहुतांश हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. केवळ एकाच पक्षातील नव्हे तर अनेक पक्षातील नेते ओष्णोजल घेत असल्याचा खळबळजनक दावाही दमानिया यांनी केला.
श्रीमंत लोकांकडून “ओश्नो जल” आणि इतर उपायांच्या नावाखाली पैसे उकळले जायचे. तर मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील महिलांना “साधना” किंवा “उपचार”च्या नावाखाली असंख्यवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोपही दमानियांनी केला.
लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असताना, बेकायदेशीर सावकारी करून लोकांच्या मालमत्ता बळकावल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. या संदर्भात एक ठोस उदाहरण म्हणून शिर्डीतील “साई सिल्वर” नावाचे मंगल कार्यालयाची माहिती दिली. हे मंगल कार्यालय शेलके-पाटील कुटुंबीयांचे आहे. हे तीन भाऊ आहेत. त्यांनी खरात याच्याकडून पैसे घेतले होते. त्यांना पैसे परत करता आले नाहीत म्हणून सावकारीच्या माध्यमातून हे मंगल कार्यालय ताब्यात घेतल्याचे दमानिया यांनी सांगितले. या तथाकथित बाबाने दोन-तीन आत्महत्याचे प्रकरणही दाबल्याचा आरोप त्यांनी केला.
खरातचे पतसंस्थामध्ये 100 कोटी रूपये असून त्यांची माहिती पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना देणार असल्याचे सांगत दमानिया यांनी खरात याच्या अनेक गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये असलेल्या जमिनीची यादीच वाचून दाखवली. सिन्नर (तालुका सिन्नर), निमगाव कोराळे (तालुका राहटा), कुंडेवाडी, मानझरे (सिन्नर परिसर), आठगाव (नाशिक), विल्होली (तालुका नाशिक), गवळलेनी (तालुका नाशिक), पाथर्डी (नाशिक)मध्ये 27 जमिनीची 7/12 असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय नाशिक शहर परिसर, निळगाव (ईशान्येश्वर मंदिर परिसर), शिर्डी (तालुका राहता) येथे त्यांची प्रचंड जमिनी असल्याचे दमानिया यांनी सांगितले.