Pudhari
मुंबई

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात कोणाकोणाचे बिंग फुटणार? सर्वपक्षीय नेत्यांमध्ये अस्वस्थता

भोंदू बाबाच्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा; पोलीस अहवालाकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नरेश कदम

आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांवर अत्याचार करणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा भांडाफोड झाल्याने या प्रकरणात कोणाकोणाचे बिंग फुटणार? यामुळे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. तर या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे खरात प्रकरणाच्या विशेष चौकशी पथकाचा चौकशी अहवाल समोर केव्हा येणार, यात खरात याच्या चौकशीत कोणाकोणाची नावे समोर येणार, कोणी कोणते कर्मकांड केले,कोणाच्या विरोधात केले याबाबत सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चर्चा आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी अनेक बड्या नेत्यांचे संबंध आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याचे बोलले जाते.दिल्लीतील एक बडा नेताही खरात याच्याकडे पूजापाठ करत असे. याबरोबरच महायुती सरकारमधील काही बड्या नेत्यांची खरातकडे ऊठबस होती. काही नेत्यांनी खरातकडून कर्मकांड केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खरात प्रकरणात कारवाई करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. खरातला सापळ्यात अडकविण्याची योजना तयार करण्यात आली.फडणवीस यांना खरातच्या दुष्कृत्याची माहिती मिळताच त्यांनी विशेष तपास पथक स्थापन करून त्यांना गुप्तपणे काम करायला सांगितले. कारण खरातचे थेट दिल्लीपर्यंत कनेक्शन असल्याने सावध पावले टाकली. खरात परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्यावर पाळत ठेवली होती.

या प्रकरणात विरोधी पक्षाचे काही नेते अडकले असले तरी सत्तारूढ पक्षाचे अनेक बडे मंत्री यात गुंतले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळले तर सत्तारूढ महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी तोंड बंद ठेवले आहे. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे, यात कोणतीही तडजोड करणार नाही, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱ्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे खरात प्रकरणाचा पोलीस तपास पथकाचा अहवाल हा अनेक बड्या नेत्यांवर टांगती तलवार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील, शिंदे गटाचे दीपक केसरकर यांसह अनेक नेत्यांची भोंदू खरात सोबतची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. मात्र केवळ फोटो आहे म्हणून संबंध जोडता येत नाही. हा तर्क मान्य केला तरी खरातसाठी काम करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांचीही नावे आता समोर येत आहेत. त्यामुळे खरातश व्यावहारिक आणि गुन्हेगारी संबंध असलेली मंडळी मुख्यमंत्र्याच्या कारवाईच्या तडाख्यात सापडतील असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT