Sharad Pawar met Chief Minister Shinde
खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  Pudhari News NetWORK
मुंबई

शरद पवार-शिंदे चर्चेला विधानसभेची किनार

पुढारी वृत्तसेवा
नरेश कदम

मुंबई : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष मिटावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी भेट घेतली असल्याचे दिसत असले, तरी बंद दरवाजाआड बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत या दोन नेत्यांमध्ये गुफ्तगू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या दोघांच्या चर्चेत विधानसभा निवडणुकीची किनार होती. मराठा-ओबीसी संघर्षात विधानसभेसाठी लोकसभेप्रमाणेच काही गुप्त समझोतेही या दोन नेत्यांमध्ये चर्चेत आले असू शकतात.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभ शिंदे गट आणि शरद पवार गटाला झाला होता. भाजपच्या मराठवाड्यातल्या सगळ्या जागा पडल्या असताना शिंदे गटाची संभाजीनगरची जागा जरांगेंच्या पाठिंब्यामुळे निवडून आली, हे लपून राहिलेले नाही. लोकसभेला दहापैकी आठ खासदार निवडून आणताना पवार गटही जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभार्थी ठरला. त्यामुळे मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार ‘सह्याद्री’वर एकत्र आले आणि त्यानिमित्ताने उभयतांत विधानसभेचे डावपेचही आखले गेले.

सोमवारी झालेल्या पवार-शिंदे यांच्या बैठकीत जरांगे यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेता येईल, याबाबत शिंदे यांना पवारांनी मार्गदर्शन केले. महायुतीत शिंदेंकडे, तर महाविकास आघाडीत शरद पवार यांच्याकडे मराठा समाज काही प्रमाणात झुकला असल्याचे चित्र आहे. शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा शरद पवार यांनी त्यांचे खास अभिनंदन केले होते. गेल्या दोन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कधीही थेट टीका केलेली नाही. त्यातच दोघांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विरोधक अजित पवार गट असल्याने या दोन नेत्यांमध्ये त्यासंदर्भात खास चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

संभाजीनगर असेल किंवा भिवंडी असेल अशा जागांवर शिंदे गट आणि शरद पवार गटात काही गुप्त समझोता झाला होता. आणि त्यात दोन्ही गटांना यश मिळाले होते. अशाच पद्धतीने आता तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही या दोन्ही गटांत काही गुप्त समझोते होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपची मते शिंदे गटाच्या उमेदवारांना मिळाली; पण शिंदे गटाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळाली नाहीत, असा आक्षेप भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे मराठा मतांसाठी शरद पवार आणि शिंदे गटात काही गणिते मांडली जाण्याची शक्यता दाट आहे. केंद्रातील सरकार पाच वर्षे टिकेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे विधानसभेसाठी काही स्वतंत्र गणिते मांडण्याचा वडीलकीचा सल्ला शरद पवार यांनी दिला असल्याचे बोलले जाते.

2019 मध्ये महायुतीत लढून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकाल लागताच भाजपला धुडकावले. येत्या विधानसभेच्या निकालानंतर याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आकडे कसे पडतात, यावर खेळ अवलंबून राहील. निकालाचे आकडे भाजपला कोंडीत पकडणारे पडतील, असे प्यादे शरद पवार हे चालवतील, असा अंदाज एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला.

गुप्त समझोते झाल्याची चर्चा

शिंदे यांची महायुतीत अजित पवार गटाशीच स्पर्धा आहे. महाविकासमध्ये शरद पवार यांना 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्याच जागा मिळणार असून, त्यांची खरी लढत अजित पवार गटाशी असेल. त्यामुळे ‘सह्याद्री’वरील बैठकीत काही गुप्त समझोते करण्याबद्दल प्राथमिक बोलणी या दोन्ही नेत्यांत झाली असल्याचे संकेत आहेत.

SCROLL FOR NEXT