BMC Pudhari
मुंबई

BMC Co-opted Corporator: २५ फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची होणार घोषणा !

महायुतीचे ६, ठाकरे ३ तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांसाठी गोड बातमी असून २५ फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची महापालिका सभागृहात घोषणा करण्यात येणार आहे. यात महायुतीचे ६, ठाकरे ३ तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. त्यामुळे कोण नगरसेवक बनणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.bmc

मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच वरून दहा करण्यात आले आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक होण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची घोषणा समिती सदस्यांच्या घोषणेपूर्वी होईल असे वाटत होते. परंतु ही घोषणा येत्या २५ फेब्रुवारीला होणार असल्यामुळे स्वीकृत नगरसेवकांचे समिती सदस्य जाण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे.

पण नगरसेवक बनायला मिळणार यामुळे इच्छुकांमध्ये खुशीचे वातावरण आहे. पण नेमकं कुणाला स्वीकृत नगरसेवक मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. महायुतीला सहा स्वीकृत नगरसेवक असल्यामुळे त्यांच्या पक्षात दोन डझन पेक्षा जास्त माजी नगरसेवकांसह वरिष्ठ पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

अन्य पक्षातही इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे पक्ष कशाप्रकारे निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या कोट्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक हवे आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला समिती सदस्य पद देण्यात आल्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या वाटणीला तीन स्वीकृत नगरसेवक आले आहेत. यातील एक स्वीकृत नगरसेवक मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाकरे गटावर दबाव येत आहे. मात्र ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सध्या मनसेमध्ये नाराजी दिसून येत आहे. ठाकरे गटामध्ये ही स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. काँग्रेसच्या वाट्याला एक नगरसेवक पद आल्यामुळे येथे कोणाची वर्णी लागणार हे सर्वस्वी मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड ठरवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार वाढणार !

स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना शक्यतो समिती सदस्य पदावर घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या नगर विकास विभागानेही जादा अधिकार देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकाचे अधिकार वाढणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT