ठाणे: आरक्षित आसनावरून झालेल्या वादात आरपीएफ कर्मचाऱ्यावर रेझर ब्लेडने हल्ला केल्याप्रकरणी ३१ वर्षीय अभिनेत्री अंतरा बॅनर्जी हिच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्टच्या रात्री वांद्रे-गंगानगर अरावली एक्स्प्रेसमध्ये डहाणू स्थानकादरम्यान घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, अंतरा स्लीपर क्लासचे तिकीट घेऊन एसी डब्यात प्रवास करत होती. यावेळी आरक्षित आसन रिकामे करण्यास सांगितल्यानंतर तेथे वाद झाला. त्यानंतर तिकीट तपासनीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिने आक्रमक होत एका सुरक्षा कर्मचाऱ्यावर रेझर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. डहाणू स्थानकात गाडी थांबल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
१३ ऑगस्ट रोजी या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे आणि जाणीवपूर्वक दुखापत आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अंतरा बॅनर्जीला पोलिसांनी नोटीस देऊन तिची जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतरा बॅनर्जींने हिंदी टीव्ही सिरीयल व काही वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे.