घाटकोपर : राज्य सरकारने घाटकोपर पश्चिम चिरागनगर येथे अण्णाभाऊ साठे यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बनवणार असल्याची घोषणा 2 एप्रिल 2024 रोजी केली होती. त्यासाठी 305.62 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या स्मारकाच्या बांधकामासाठी 8734 चौरस मीटर जागा विकसित करण्यात येणार आहे.
हा सर्व झोपडपट्टीबहुल भाग असून येथे 920 हून अधिक घरे बाधित होणार आहेत. दोन फेजमध्ये हे स्मारक विकसित केले जाणार आहे. यासाठी पहिल्या फेजमधील सुमारे 250 घरे बाधित होणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत या बाधितांना घाटकोपरमध्येच अन्य ठिकाणी घरे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र देण्यात येणारी घरे आम्हाला मान्य नसून याच जागेवर आम्हाला घरे द्यावीत, अशी ठाम भूमिका यावेळी रहिवाशांनी घेतली आहे.
याशिवाय याबाबत एसआरएने सदरच्या 250 घरांना विश्वासात घेतले गेले नसून कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणचा बायोमेट्रिक पद्धतीने सर्वे केल्याचे सांगून घरांना नोटीस लावून काही अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने घरे खाली करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या एकंदरीत घडामोडींमुळे सदर मोक्याची व महत्त्वाची जागा राज्य सरकारकडून काही बिल्डरांच्या घशात घालण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आमच्या आतापर्यंत चार पिढ्या येथे गेल्या आहेत. अण्णाभाऊंचे स्मारक झालेच पाहिजे पण त्याबरोबर येथेच आम्हाला घरेही मिळाली पाहिजेत यासाठी स्थानिकांकडून मागील आठवड्यात निदर्शने करण्यात आली. घर नाही, तर मत नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्यामुळे रहिवाशांना याच ठिकाणी घरे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र आम्हाला आश्वासने नकोत, लेखी हमी किंवा जीआर काढावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा घराची एकही वीट पाडू दिली जाणार नाही. त्यासाठी संविधानिक मार्गाने जे करावे लागेल ते केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून स्थानिकांमध्ये घरांबाबत संभ्रमावस्था व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला कोणाचाही विरोध नाही. अण्णाभाऊंचे स्मारक ही आमच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. मात्र अन्य ठिकाणी देण्यात येणाऱ्या घरांचा पर्याय आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे जीआरमध्ये रूपांतर करावे. आम्हाला अशाप्रकारे लेखी हमी दिल्याशिवाय आम्ही इथून कुठल्याही परिस्थितीत हलणार नाही. यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देण्यास आम्ही तयार आहोत, असे अण्णाभाऊ साठे यांचे नातू अनिल साठे यांनी सांगितले.